महामेळावा दडपण्याचा कर्नाटक प्रशासनाचा प्रयत्न, बेळगावात मराठी भाषिकांची 'धरपकड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:09 IST2025-12-09T12:07:46+5:302025-12-09T12:09:55+5:30
''कर्नाटक''च्या बसवर ''जय महाराष्ट्र!, ''गडहिंग्लज''ला उद्धवसेनेचे आंदोलन

महामेळावा दडपण्याचा कर्नाटक प्रशासनाचा प्रयत्न, बेळगावात मराठी भाषिकांची 'धरपकड'
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी साेमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मराठी भाषिक महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. दडपशाही केली. तरी यास न जुमानता मराठी भाषिकांनी आपली अस्मिता दाखवीत पुन्हा एकदा लेले मैदान परिसरात एकत्रित येत कानडी दांडेलीचा निषेध केला.
पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही म. ए. समितीने लोकशाही हक्काचा आधार घेत मेळावा आयोजित करण्याचा निर्धार केल्यामुळे बेळगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मेळावा होऊ नये यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून कर्नाटक सरकारने पोलिसांना हाताशी धरून आयोजनात अडथळा आणण्यास सुरुवात केली.
व्हॅक्सिन डेपो परिसरासह अनेक संवेदनशील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून मोठा पोलिस बंदाेबस्त ठेवला होता. व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे जाणाऱ्या टिळकवाडीतील आगरकर रोड, रानडे रोड, रॉय रोड, तसेच दुसऱ्या रेल्वे गेटकडून जाणारा रस्ता, आदी सर्व रस्ते बंद केले होते. व्हॅक्सिन डेपो मैदानाला साेमवारी पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर, हिवाळी अधिवेशनविरोधी महामेळाव्याच्या आयोजनात अडथळा आणण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी पहाटेपासूनच धरपकड सुरू केली. पूर्व खबरदारी म्हणून वॅक्सिन डेपो मैदानाकडे जमा होण्यासाठी येणाऱ्या सर्वच समिती नेत्यांना ताब्यात घेऊन एपीएमसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले.
सुरुवातीला म. ए. समितीचे नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, मनोहर उंदरे यांच्यासह अनेकांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे कूच केली. यावेळी पोलिसांनी त्यांना मैदानात प्रवेश करण्यापासून रोखले असता दोन्ही बाजूंमध्ये मोठी शाब्दिक चकमक उडाली.
कार्यकर्त्यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशा जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी माजी आमदार मनोहर किनेकर, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, समिती खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, रामचंद्र मोदगेकर, प्रेमा मोरे, रणजित चव्हाण पाटील, संजय शिंदे, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि एपीएमसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करून काही वेळाने सुटका केली.
यासंदर्भात शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना, ८ डिसेंबरच्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगी मागितली होती. तथापि, काही भिन्न आणि प्रशासकीय कारणांमुळे ती मागणी फेटाळली असून, तसे लेखी स्वरूपात आयोजकांना कळविले आहे. नियमांचे उल्लंघन करून मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
लोकशाहीच्या मार्गातून आमचा आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. हिवाळी अधिवेशनाला पहिल्या अधिवेशनापासून आम्ही विरोध करीत आलो आहाेत. महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांनी दिल्ली दरबारी आवाज उठवून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय कमी करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले.
''कर्नाटक''च्या बसवर ''जय महाराष्ट्र!, ''गडहिंग्लज''ला उद्धवसेनेचे आंदोलन
गडहिंग्लज : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमा भागातील मराठी बांधवांवरील दडपशाहीचा उद्धवसेनेच्या येथील सैनिकांनी निषेध नोंदवला. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजीही केली.
बेळगाव येथील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मेळाव्याच्या विरोधातील कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ हे आंदोलन केले. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सायंकाळी येथील आगारात आलेल्या कर्नाटक आगाराच्या बसवर ''जय महाराष्ट्र'' लिहून भगवे झेंडे लावण्यात आले. तसेच बसवरील कानडी भाषेतील मजकूर काळ्या शाईने खोडण्यात आला. या अनोख्या आंदोलनाची सीमाभागात विशेष चर्चा आहे.