कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना कोर्टाच्या आवारातूनच पाच कुख्यात आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत एका आरोपीला अटक केली. मात्र इतर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. फरार झालेल्या कैद्यांवर चोरी आणि लुटमारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
फरार असलेल्यांमध्ये राजनंदन उर्फ छोटू ऊर्फ हंटर, अरविंद सहनी, मनीष कुमार आणि मनजित कुमार यांचा समावेश आहे. आता पोलिसांनी या आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू केली आहे. तसेच चारही आरोपींचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे कोर्टाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्म्स अॅक्ट अन्वये अटक असलेल्या एका आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर कोठडीत ठेवण्यात येत होते. त्यावेळी आतमध्ये कैद असलेल्या इतर कैद्यांनी धक्काबुक्की सुरू केली. तसेच संधी साधून काही आरोपी पळू लागले. तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत नागेंद्र कुमार नावाच्या एका कैद्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. आता पोलीस फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत.