पीएमटी निकालास ‘सर्वोच्च’ स्थगिती!
By Admin | Updated: June 4, 2015 00:43 IST2015-06-04T00:43:53+5:302015-06-04T00:43:53+5:30
अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचा (एआयपीएमटी) निकाल १० जूनपर्यंत लावू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीएसईला दिल्यामुळे

पीएमटी निकालास ‘सर्वोच्च’ स्थगिती!
नवी दिल्ली : अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचा (एआयपीएमटी) निकाल १० जूनपर्यंत लावू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीएसईला दिल्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून पेपरफुटीमुळे ही परीक्षा वादग्रस्त ठरली.
हरियाणा पोलिसांना लाभार्थ्यांची नेमकी संख्या स्पष्ट करण्यासह नवा अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देतानाच या न्यायालयाने फेरपरीक्षेबाबत १० जून रोजी सुनावणी निश्चित केली आहे. सीबीएसईने ही परीक्षा देणाऱ्या सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल ५ जून रोजी घोषित करण्याची तयारी चालविली होती. ३ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील पेपरफूट व अनियमितता पाहता फेरपरीक्षा घेण्याची मागणी एका याचिकेत करण्यात आली होती.
न्या. पी. सी. पंत व अमितावा रॉय यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने १० जून रोजी पोलिसांकडून स्थिती अहवाल मिळाल्यानंतर त्याबाबत निर्णय देण्याचे ठरविले. परीक्षेच्या शुचितेबाबत संशय निर्माण झाला असताना निकाल जाहीर होणे हा मोठा मुद्दा असल्याची आम्हाला जाणीव आहे. पुन्हा फेरपरीक्षा घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही, मात्र हा निर्णय आम्हाला घिसाडघाईने घ्यायचा नाही. तपास पूर्ण व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. भविष्यातील कारवाईबाबत निर्णय घेणे महत्त्वाचे, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)