मोदींच्या झंझावाती सभा, इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यासाठी समिती, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची खास रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 15:20 IST2024-01-02T15:19:11+5:302024-01-02T15:20:40+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मोदींच्या झंझावाती सभा, इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यासाठी समिती, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची खास रणनीती
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आज पक्षाच्या मुख्यालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांचं नियोजन करण्यात आलं.
मिळत असलेल्या माहितीनुसार २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक राज्यांमध्ये झंझावाती सभा होतील. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या देशव्यापी दौऱ्यांबाबतही चर्चा करण्यात आली. त्याशिवाय बैठकीमध्ये जनतेला रामललांचं दर्शन घडवण्याबाबतची चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून हजारो लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याबाबत विचार करण्यासाठी भाजपाने जॉयनिंग समितीची स्थापना केली आहे. ही समिती ज्या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, त्यांनाच भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पार्टी मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील सुमारे १५० नेते सहभागी होती.