पंतप्रधान मोदींचे भाऊ रिक्षा चालवतात; बिप्लब देब यांचा नवा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 10:48 PM2018-10-01T22:48:28+5:302018-10-01T22:49:57+5:30

देशासाठी झटणाऱ्या मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी जनतेनं दिवसातून एकदा प्रार्थना करावी, असं आवाहन बिप्लब देब यांनी केलं.

pm narendra modis brothers drives auto claims tripura cm biplab deb | पंतप्रधान मोदींचे भाऊ रिक्षा चालवतात; बिप्लब देब यांचा नवा शोध

पंतप्रधान मोदींचे भाऊ रिक्षा चालवतात; बिप्लब देब यांचा नवा शोध

googlenewsNext

आगरताळा: आपल्या अजब विधानांनी कायम चर्चेत राहणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आता एक नवा शोध लावला आहे. विशेष म्हणजे देब यांनी लावलेला नवा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. मोदींचे एक भाऊ रिक्षा चालवतात, तर दुसऱ्या भावाचं किराणा मालाचं दुकान आहे, असा दावा देब यांनी केला आहे. 

सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आगरताळामध्ये पराक्रम पर्व नावाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उपस्थितांनी संवाद साधताना बिप्लब कुमार देब यांनी मोदी आणि त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला. मोदींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलताना देब यांनी बरीच 'नवी' माहिती दिली. 'मोदीचं कुटुंब अतिशय साधेपणानं राहतं. त्यांचा एक तर आजही भाऊ रिक्षा चालवतो,' असं देब म्हणाले. 

मोदी गेल्या 4 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्याआधी 13 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र आजही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आधीसारखीच आहे, अशी स्तुतीसुमनं देब यांनी उधळली. 'मोदींची आई अतिशय वृद्ध आहे. मात्र त्या आजही एका 10 बाय 12 च्या खोलीत राहतात. त्या मोदींसोबत पंतप्रधान निवासात राहात नाहीत. मोदींचे एक भाऊ रिक्षा चालवतात. तर दुसरे भाऊ किराणा मालाचं दुकान सांभाळतात. तुम्ही असा पंतप्रधान कधी पाहिलाय का?', असं देब यांनी म्हटलं. 

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब त्यांच्या अजब विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. महाभारत काळात इंटरनेट होतं, असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. 'प्रत्यक्ष युद्धभूमीवर नसूनही संजयनं महाभारतात युद्धभूमीवरील घडामोडी धृतराष्ट्रांना सांगितल्या होत्या. याचा अर्थ त्यावेळीदेखील इंटरनेट, उपग्रह यासारख्या गोष्टी होत्या. त्यावेळीदेखील तंत्रज्ञान अस्तित्वात होतं,' असं विधान देब यांनी केलं होतं. 

Web Title: pm narendra modis brothers drives auto claims tripura cm biplab deb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.