पाकचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 17:54 IST2020-01-28T17:42:59+5:302020-01-28T17:54:12+5:30
शेजारील देश तीनदा युद्धात पराभूत झालेला आहे. ते लोक छुपं युद्ध लढत आहेत.

पाकचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत- मोदी
नवी दिल्लीः शेजारील देश तीनदा युद्धात पराभूत झालेला आहे. ते लोक छुपं युद्ध लढत आहेत. त्या शेजारील देशाचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या रॅलीला संबोधित केलं आहे. त्यावेळी ते बोलत होते.
जगात आमच्या देशाची ओळख तरुणांचा देश अशी आहे. देशातील 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षांहून कमी वयाच्या लोकांची आहे. देशातील तरुणाचा आम्हाला गर्व आहे. पण देशाचे विचारही चिरतरुण राहिले पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आजचा तरुण देशाला बदलू इच्छितो. देशाची परिस्थिती त्याला बदलायची आहे. स्वातंत्र्यानंतरही देश परिस्थिती कधी बदलणार आहे?, कधीपर्यंत जुन्याच गोष्टी कुरवाळत बसणार आहात, हे प्रश्न तरुणांना सतावत आहेत.
एनसीसी देशातील तरुणांना ऊर्जा, शासन, भक्ती आणि अशा प्रकारच्या भावनांना प्रोत्साहित करत आहे. या गोष्टी सरळ विकासाशी जोडल्या गेलेल्या आहेत. ज्या देशात तरुण शासन, इच्छाशक्ती, निष्ठा प्रबळ असते, त्या देशाचा विकास कधीही थांबू शकत नाही. भारतातल्या तरुणांना परिवर्तन हवं आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत जे झालं नाही, ते तरुणांना घडवायचं आहे.