पंतप्रधान मोदी 28 जूनला UAE दौऱ्यावर जाणार, जर्मनीतील जी-7 बैठकीतही सहभागी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:51 IST2022-06-22T16:49:16+5:302022-06-22T16:51:54+5:30
Prime Minister Narendra Modi's Foreign Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी 7 शिखर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून 26-27 जून रोजी स्कॉल्स अल्माऊला भेट देतील.

पंतप्रधान मोदी 28 जूनला UAE दौऱ्यावर जाणार, जर्मनीतील जी-7 बैठकीतही सहभागी होणार!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 28 जून रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 जून रोजी जर्मनीतील जी 7 शिखर परिषदेत (G7 Summit) सहभागी झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीला जातील आणि येथील माजी राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक राहिलेले शेख खलीफा बिन झायेद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांनी श्रद्धांजली अर्पण करतील.
याचबरोबर, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे संयुक्त अरब अमिरातीचे नवे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिनंदन देखील करतील, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. 28 जूनला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीहून परतणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी 7 शिखर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून 26-27 जून रोजी स्कॉल्स अल्माऊला भेट देतील. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.
जर्मनीच्या (Germany) अध्यक्षतेखाली जी 7 शिखर परिषद (G7 Summit) आयोजित केली जात आहे, यामध्ये अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जर्मनी दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सत्रांना संबोधित करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांचा समावेश आहे. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेत सहभागी असलेल्या काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार असल्याचे सांगण्यात आले.