महाकुंभमेळ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा PM मोदींनी घेतला समाचार; म्हणाले, “धर्म अन् देश...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:40 IST2025-02-24T10:39:37+5:302025-02-24T10:40:51+5:30
PM Narendra Modi News: महाकुंभमेळा एकतेचा महाकुंभ म्हणून प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

महाकुंभमेळ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा PM मोदींनी घेतला समाचार; म्हणाले, “धर्म अन् देश...”
PM Narendra Modi News: १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. मकर संक्रातीला सुरू झालेल्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत तब्बल ६२ कोटींहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून दिग्गज कलाकार, सेलिब्रिटी, उद्योजक अतीव श्रद्धेने सहभागी झाले. आता १४४ वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून येणार आहे. महाकुंभमेळ्यात काही अप्रिय घटनाही घडल्या. यावरून विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर यथेच्छ टीका केली. यावरून आता पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभमध्ये गैरव्यवस्थापन आणि चेंगराचेंगरीच्या घटनांचा दाखला देत महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ संबोधले होते. तसेच इंडिया आघाडीतील सामील पक्षांच्या नेत्यांनीही महाकुंभमेळ्यावरून टीकास्त्र सोडले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत पलटवार केला आहे.
देश आणि धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न
गुलामांची मानसिकता असलेले लोक परदेशी शक्तींच्या पाठिंब्याने देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांवर आक्रमण करीत आहेत. आताच्या घडीला आपण पाहतो की, आपल्या धर्माची खिल्ली उडवणाऱ्या नेत्यांचा एक गट आहे. ते एकता भंग करण्यात आणि लोकांमध्ये फूट पाडण्यात गुंतलेले आहेत. अनेक वेळा परदेशी शक्तीही या लोकांना पाठिंबा देऊन देश आणि धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या वेशात जगत आहेत. गुलामगिरीच्या मानसिकतेने वेढलेले हे लोक आपल्या मठांवर, मंदिरांवर, आपल्या संतांवर, संस्कृतीवर आणि तत्त्वांवर हल्ले करत राहतात. हे लोक आपले सण, परंपरा आणि चालीरीतींचा गैरवापर करतात. पुरोगामी असलेल्या धर्म आणि संस्कृतीवर चिखलफेक करण्याचे धाडस ते दाखवतात, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी निशाणा साधला.
दरम्यान, भारतात होत असलेल्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. महाकुंभ आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोक महाकुंभमेळ्यात पोहोचले आहेत. कोट्यवधी लोकांनी अद्भूत अनुभव घेतला आहे. संतांचे दर्शन घेतले आहे. आपण या महाकुंभाकडे पाहिले तर आपल्याला सहज लक्षात येईल की, हा एकतेचा महाकुंभ आहे. १४४ वर्षांनी आलेला हा महाकुंभमेळा एकतेचा महाकुंभ म्हणून प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.