PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 05:23 IST2025-10-22T05:23:12+5:302025-10-22T05:23:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त भारतीयांंना उद्देशून खुले पत्र लिहिले.

PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरतो हे त्यांनी अभिमानाने सांगावे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त जनतेला मंगळवारी दिला. त्यांनी नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा नारा अधिक बुलंद करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
मोदी यांनी म्हटले आहे की, आज जग विविध संकटांनी ग्रासले असताना भारत स्थैर्याचे प्रतीक म्हणून उदयास आला आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरात घट करण्याचा निर्णय हे आमच्या सरकारचे ऐतिहासिक यश आहे. ‘जीएसटी बचत उत्सव’दरम्यान नागरिक हजारो कोटी रुपयांची बचत करत आहेत. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे, सर्व भाषांचा आदर करण्याचे, स्वच्छतेचे पालन करण्याचे, योगासने करण्याचे, आहारातील तेलाचे प्रमाण १० टक्के कमी करण्याचे, आरोग्याला प्राधान्य देण्याचे पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले.
या गोष्टींचा स्वीकार केल्याने आपण लवकरच विकसित भारत घडविण्याच्या दिशेने झपाट्याने पुढे जाऊ, असे त्यांनी सांगितले. जसे दिवे एकमेकांना प्रकाशित करतात. त्याच भावनेने समाजात सकारात्मकतेचे दिवे लावूया अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अन्यायाचा सूड घेतला
भगवान श्रीराम आपल्याला धर्माचं पालन करण्याची शिकवण देतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्यही प्रदान करतात. त्याचे जिवंत उदाहरण आपल्याला काही महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाहायला मिळाले. या लष्करी कारवाईमध्ये भारताने केवळ धर्माचे पालन केले नाही, तर अन्यायाचाही सूड घेतला, असे पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीनिमित्त लिहिलेल्या खुल्या पत्रात मंगळवारी म्हटले आहे.
नक्षलवादमुक्त जिल्ह्यांत दिवाळीचा मोठा जल्लोष
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद समूळ नष्ट झाला आहे, अशा ठिकाणीही यंदा जल्लोषात दिवाळी साजरी होत आहे. हे या वर्षाचे खास वैशिष्ट्ये आहे. गेल्या काही कालावधीत अनेक लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे.
आपल्या संविधानावर विश्वास दाखवला आहे. ही देशासाठी खूप महत्त्वाची घटना आहे. मोदी यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मी आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या नौदलाच्या विमानवाहू जहाजावर नौदल सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
‘देशातील स्थैर्यामुळे प्रगतीला चालना’
जगावर अनेक संकटे येत आली. पण, भारताने आपली प्रगती सुरूच ठेवली. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. देशातील स्थैर्यामुळे ही गोष्ट शक्य होणार आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.