'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:37 IST2026-03-24T14:36:55+5:302026-03-24T14:37:27+5:30
'भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.'

'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले
PM Narendra Modi in Budget Session : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज(दि.24) राज्यसभेत इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. भारताने नेहमीच संवादाचा मार्ग सुचवला असून सर्व संबंधित देशांशी भारत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
युद्धाचे गंभीर परिणाम...
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नसते. या संघर्षाचे समाधान संवादातूनच होऊ शकते. भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळे भारत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
LIVE: PM Shri @narendramodi’s remarks in the Rajya Sabha on the ongoing conflict in West Asia. https://t.co/k7RFY1dEQH
— BJP (@BJP4India) March 24, 2026
आत्मनिर्भरतेवर सरकारचा भर
पंतप्रधानांनी सांगितले की, भारत कोणत्याही क्षेत्रात इतर देशांवर जास्त अवलंबून राहू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शिपबिल्डिंगपासून रेअर अर्थ मिनरल्सपर्यंत अनेक क्षेत्रांत आत्मनिर्भरतेसाठी पावले उचलली आहेत. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून परिस्थितीतून सावरण्यासाठी वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.
संकट ही देशाच्या धैर्याची परीक्षा
मोदी म्हणाले की, कोणतेही संकट हे देशाच्या धैर्य आणि प्रयत्नांची परीक्षा घेत असते. मागील 11 वर्षांत भारताने अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आवश्यक वस्तूंचा पुरवठा भारतात सुरळीत राहावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरवरील हल्ल्यांचा भारताचा निषेध
पश्चिम आशियातील युद्धाला तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. यामुळे जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आणि त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. भारताने नागरिक, नागरी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.