श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:42 IST2025-11-25T16:39:50+5:302025-11-25T16:42:06+5:30
PM Narendra Modi in Ayodhya : पीएम मोदी मेकॉलेचा मुद्दा वारंवार का उपस्थित करतात? काय आहे वाद? जाणून घ्या...

श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
PM Narendra Modi in Ayodhya : आज रामनगरी अयोध्येत श्रीराम मंदिराचा धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता’ हा मुद्दा उपस्थित केला. लक्ष्य राम मंदिर उभारण्यापेक्षा कठीण असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय समाजाच्या मनात इंग्रजी राजसत्तेकडून आलेली हीनभावना आजही जिवंत असल्याची टीका त्यांनी केली.
मोदी यांनी पुढील दशक ‘मॅकॉले मानसिकतेतून मुक्तीचे दशक’ ठरवण्याचे आवाहन केले. 1835 मध्ये थॉमस बाबिंग्टन मॅकॉलेची शिक्षणनीती भारतात लागू झाली. 2035 ला त्या धोरणाला 200 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदींचे भाषण केवळ धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अर्थांनी अधिक व्यापक झाले.
मॅकॉलेचा उल्लेख वारंवार का?
पंतप्रधान मोदी यांचे मत आहे की, मॅकॉलेच्या शिक्षणप्रणालीने भारतीय भाषा, संस्कृती आणि आपल्या ज्ञानपरंपरेला दुय्यम ठरवून इंग्रजीला श्रेष्ठत्व दिले गेले. या धोरणामुळे भारतीयांमध्ये स्वतःच्या सांस्कृतिक आणि भाषिक संपदेबाबत कमीपणाची भावना निर्माण झाली. त्यांच्या मते, भारतीय मनात रुतलेल्या या मानसिक गुलामगिरीला तोडल्याशिवाय आत्मनिर्भर भारताची पायाभरणी शक्य नाही.
Ayodhya, Uttar Pradesh: Prime Minister Narendra Modi says, "Another important aspect of our heritage is liberation from the mindset of slavery. 190 years ago, in 1835, the Englishman Macaulay sowed the seeds to uproot India from its roots, laying the foundation of mental… pic.twitter.com/JW9KuywhQc
— IANS (@ians_india) November 25, 2025
राम मंदिरातून ‘मुळाशी जोडणाऱ्या’ वाटचालीची सुरुवात
मोदी यांचा दावा आहे की, राम मंदिर हा फक्त धार्मिक प्रकल्प नाही, तर राष्ट्रीय आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्याचा क्षण आहे. ‘मुळांशी जोडणे’ म्हणजे भूतकाळात परत जाणे नव्हे, तर आधुनिक भारताच्या विकासाला भारतीय मूल्यांच्या आधारे दिशा देणे, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु विरोधकांचा आरोप आहे की, या भाषणातून भारताला हिंदुत्वाच्या चौकटीत आणि अवैज्ञानिकतेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मातृभाषेला प्राधान्य की ‘हिंदी थोपवण्याचा’ आरोप?
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) ही मातृभाषा आणि भारतीय भाषांना समान स्थान देण्याची पहिली मोठी पायरी असल्याचे मोदी सांगतात. त्यांचा युक्तिवाद असा की, संशोधन, विचार आणि ज्ञाननिर्मितीसाठी इंग्रजीचा आधार आवश्यक असला तरी, इंग्रजीला श्रेष्ठ मानणे ही खरी समस्या आहे. परंतु राजकीय विरोधक, विशेषतः तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पक्ष, या भूमिकेला ‘हिंदी लादण्याचा प्रयत्न’ म्हणून पाहतात.
अयोध्या से लाइव: श्रीराम जन्मभूमि मंदिर ध्वजारोहण महोत्सव। https://t.co/OxscUvaLOQ
— BJP (@BJP4India) November 25, 2025
संस्कृती, मंदिर विकास आणि राजकीय अर्थ
मोदी सरकार मंदिर, तीर्थक्षेत्रे आणि वारसास्थळांच्या विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यांचे मत आहे की संस्कृती आणि पर्यटन हे भारताचे मोठे ‘सॉफ्ट पॉवर’ बनू शकतात. विरोधक मात्र या सांस्कृतिक उपक्रमांना सरळ हिंदुत्व-राजकारणाशी जोडतात आणि मुस्लिमविरोधी अजेंडा असल्याचा आरोप करतात.