लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 20:44 IST2020-01-20T20:39:40+5:302020-01-20T20:44:41+5:30

विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून मार्गदर्शन

PM Narendra Modi cites VVS Laxman Rahul Dravids heroics while motivating students | लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग

लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग

नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या मनात असलेली परीक्षेबद्दलची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्याशी संवाद साधला. परीक्षेतील गुण म्हणजे सर्व काही नाही. त्यामुळे परीक्षेला घाबरू नका. अपयश आयुष्याचा भाग आहे. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही, अशा शब्दांत मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणं देत परीक्षेचा तणाव घेऊ नका, असं आवाहन केलं. नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो, बिकट प्रसंगात संघर्ष करुन विजयी होता येतं, हे सांगताना मोदींनी क्रिकेटच्या मैदानातलं उदाहरण दिलं. २००१ मध्ये कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनं केलेल्या खेळीची आठवण मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितली. 'आपल्या संघाला त्यावेळी लागोपाठ धक्के बसत होते. परिस्थिती आव्हानात्मक होती. पण त्या परिस्थितीत द्रविड आणि लक्ष्मणनं केलेली कामगिरी कशी विसरता येईल? त्यांना संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं,' असं मोदी म्हणाले. अनिल कुंबळेनं दुखापत झालेली असतानाही केलेली गोलंदाजी विसरता येण्यासारखी नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास अशा प्रकारे संघर्ष करता येतो, अशा शब्दांत मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. 

आयुष्यात येणाऱ्या अपयशाला घाबरू नका, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी चांद्रयान-२ मोहिमेचं उदाहरण दिलं. चांद्रयान मोहिमेदरम्यान मला इस्रोच्या कार्यालयात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण चांद्रयानचं लँडिंग यशस्वी होईल, याबद्दल कोणालाही खात्री नव्हती. पण तरीही मी तिथे गेलो, असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. 

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी २०० विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नव्या तंत्रज्ञानावर भाष्य केलं. नवं तंत्रज्ञान आत्मसात करा. पण त्याच्या आहारी जाऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. 'तंत्रज्ञानावर तुम्ही नियंत्रण ठेवा. ते तंत्रज्ञान तुमच्यावर नियंत्रण ठेवेल, इतका त्याचा वापर करू नका. तंत्रज्ञानामुळे तुमचा वेळ उगाच खर्च होणार नाही, याची काळजी घ्या,' असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. 

प्रत्येक घरात एक खोली तंत्रज्ञानमुक्त असायला हवी, असा विचार पंतप्रधानांनी मांडला. घरातली एक खोली गॅजेट्समुक्त असायला हवी, असं मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळायला हवेत, असं त्यांनी म्हटलं. 'दिवसातला कमीत कमी एक तास तंत्रज्ञानमुक्त असायला हवा. त्या वेळेत विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळायला हवं. विद्यार्थ्यांनी त्यांचा मोकळा वेळ ज्येष्ठांसोबत घालवायला हवा,' असं मोदींनी सांगितलं. अनेक पालक मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची सक्ती करतात. मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये गुंतवणं काही पालकांना प्रतिष्ठेचं वाटतं. अशा पालकांनी त्यांचा दृष्टीकोन बदलायला हवा, असं आवाहन मोदींनी केलं. 
 

Web Title: PM Narendra Modi cites VVS Laxman Rahul Dravids heroics while motivating students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.