पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना लावला फोन; पश्चिम आशियातील तणावावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 23:05 IST2026-03-24T23:04:30+5:302026-03-24T23:05:51+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मध्य-पूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना लावला फोन; पश्चिम आशियातील तणावावर चर्चा
नवी दिल्ली - पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये पश्चिम आशियातील जागतिक ऊर्जा सुरक्षेवर चर्चा झाली. जवळचे आणि विश्वासू भागीदार म्हणून सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं दोघांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी दिली सविस्तर माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी संवाद साधला आणि पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. ज्यात जागतिक ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या आव्हानांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. भारत-श्रीलंका ऊर्जा सहकार्य मजबूत करण्याच्या आणि प्रादेशिक सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने असलेल्या प्रमुख उपक्रमांवरील प्रगतीचा आम्ही आढावा घेतला. जवळचे आणि विश्वासू भागीदार म्हणून सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार केला असं त्यांनी सांगितले.
संघर्ष रोखण्यासाठी ट्रम्प यांचा पुढाकार
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मध्य-पूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर दिला आणि संपर्कात राहण्याचे वचन दिले. मध्य पूर्वेतील संघर्ष कमी करण्याच्या दिशेने डोनाल्ड ट्रम्प पाऊल टाकत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीला चर्चा फिस्कटली होती त्यानंतर अमेरिका इस्रायलने मिळून इराणवर सैन्य कारवाई केली. या संघर्षात आतापर्यंत १५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांनाही टार्गेट केले. त्यामुळे हे युद्ध मध्य पूर्वेत भडकले. त्यात स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक ऊर्जा संकट उद्भवले. त्यामुळे ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्यामुळे इराणसोबत नव्याने चर्चेसाठी अमेरिका प्रयत्नशील असून चर्चेतून या युद्धावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प हालचाली करत आहेत. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ट्रम्प यांनी साधलेला संवाद याच दिशेने आणखी एक पाऊल आहे का हे पाहणे गरजेचे आहे.