पंतप्रधान मोदींचे बंधुराज अडचणीत; अवैध बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 18:23 IST2018-06-22T18:23:39+5:302018-06-22T18:23:39+5:30
पालिकेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. शेवटी हे बांधकाम पडले.

पंतप्रधान मोदींचे बंधुराज अडचणीत; अवैध बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे अवैधरित्या बांधकाम केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. अहमदाबाद महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अहमदाबादच्या रबरी कॉलनी येथील एका रेशनच्या दुकानाच्या शेजारी प्रल्हाद मोदी यांनी अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. पालिकेने दोनदा नोटीस बजावूनही प्रल्हाद मोदी यांनी हे बांधकाम सुरूच ठेवले होते. पालिकेने आता तिसऱ्यांदा नोटीस बजावली असून यानंतर बांधकाम पाडण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.
प्रल्हाद मोदी सध्या छत्तीसगढमध्ये आहेत. त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी पालिकेने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंड भरून हे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले होते. मात्र, २०१५ नंतर हे बांधकाम कोणत्याही क्षणी पडण्याची भीती निर्माण झाल्याने मी पालिकेला पत्र लिहून त्यांना या बांधकामाची पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र, पालिकेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. शेवटी हे बांधकाम पडले. त्यानंतर मी पुन्हा बांधकाम सुरू केले. हेच बांधकाम पालिकेनं नियमित केले होते. आता मात्र त्यांना अचानक जाग आली असून नोटीस पाठवू लागले असल्याचा आरोप मोदी यांनी केला.