‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:59 IST2025-12-20T14:58:12+5:302025-12-20T14:59:00+5:30
PM Narendra Modi West Bengal Kolkata Visit: बिहारनंतर आता पश्चिम बंगाल जंगलराजपासून मुक्त झाला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
PM Narendra Modi West Bengal Kolkata Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. आताच्या घडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या SIR प्रक्रियेला पश्चिम बंगालमधून मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या ठिकाणी SIR विरोधात ममता बॅनर्जी यांनी रॅली केली. त्याच भागात पंतप्रधान मोदी सभा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तत्पूर्वी, खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर नियोजित सभास्थळी उतरू शकले नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने सभेला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील नादिया येथील ताहेरपूर येथे एका रॅलीसाठी पोहोचले. परंतु कमी दृश्यमानतेमुळे त्यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदी कोलकाता विमानतळावर परतले. पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता विमानतळावरून रॅलीला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले. खराब हवामानामुळे रॅलीच्या ठिकाणी पोहोचू न शकल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी जनतेची माफी मागितली.
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात महान साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांना आदरांजली वाहिली आणि म्हटले की, वंदे मातरम् हा ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या संघर्षाचा मंत्र होता. तोच वंदे मातरम् हा मंत्र आता राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. रॅलीला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांच्या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि कुटुंबांचे सांत्वन केले. या दुःखाच्या वेळी केंद्र सरकार पीडित कुटुंबांसोबत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या सोबत आहे. जीएसटीमुळे पश्चिम बंगाल आणि संपूर्ण देशातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे . दुर्गा पूजा आणि इतर सणांमध्ये देशभरातील लोकांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. गंगा बिहारमधून बंगालमध्ये वाहते. बिहारने बंगालला मार्ग दाखवला आहे. बंगाल जंगलराजापासून मुक्त झाला पाहिजे. सर्व वयोगटातील लोकांची तीच मागणी आहे. पश्चिम बंगालच्या लोकांसाठी मनापासून समर्पित आहेत. राज्यासाठी निधी आणि धोरणांची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी दिली.