पीएम मोदींचे मिशन साउथ; केरळ-तामिळनाडूत 16,450 कोटींच्या विकास प्रकल्पांने उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:24 IST2026-03-10T17:23:38+5:302026-03-10T17:24:04+5:30
रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि ग्रामीण संपर्काशी संबंधित या प्रकल्पांद्वारे केंद्र सरकार पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे.

पीएम मोदींचे मिशन साउथ; केरळ-तामिळनाडूत 16,450 कोटींच्या विकास प्रकल्पांने उद्घाटन
नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्शूवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (11 मार्च) केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दोन्ही राज्यांमध्ये मिळून सुमारे 16,450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि ग्रामीण संपर्काशी संबंधित या प्रकल्पांद्वारे केंद्र सरकार पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे.
एर्नाकुलममध्ये 10,800 कोटींचे प्रकल्प
पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात केरळमधील एर्नाकुलम येथून होणार आहे. येथे ते सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या कोची रिफायनरीमध्ये उभारण्यात येणारी पॉलीप्रॉपिलीन युनिट आहे. सुमारे 5,500 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून प्लास्टिक, ऑटोमोबाईल आणि वैद्यकीय उपकरण उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होणार आहे. सरकारच्या मते, या प्रकल्पामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
रस्ते प्रकल्पांवर भर
रस्ते पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी नॅशनल हायवे-66 वरील थालापडी-चेंगला या भागाचे सहा लेनमध्ये रूपांतर करण्याचा 2,650 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा मार्ग मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा भाग असून त्यामुळे कासरगोड आणि कन्नूर जिल्ह्यांमधील संपर्क सुधारण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कोझिकोड बायपासवरील वेंगलम ते रामनट्टुकारा या सहा लेन मार्गाचे उद्घाटनही होणार आहे. सुमारे 2,140 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार झालेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ एका तासावरून 15–20 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण संपर्क सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तयार झालेल्या 23 रस्त्यांचेही उद्घाटन पंतप्रधान करतील.
दक्षिणेला पाच नवीन रेल्वे सेवा
रेल्वे क्षेत्रात अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत शोरनूर जंक्शन, कुट्टिपुरम आणि चंगनास्सेरी या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान दोन अमृत भारत एक्सप्रेस, दोन एक्सप्रेस ट्रेन आणि एक प्रवासी ट्रेन यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या सेवांमुळे तामिळनाडूची कनेक्टिव्हिटी तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व भारताशी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय शोरनूर-नीलांबूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला जाईल आणि पालक्काड-पोलाची दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू केली जाईल.
फ्लोटिंग सोलर प्रकल्पाची पायाभरणी
केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील वेस्ट कल्लाडा येथे उभारण्यात येणाऱ्या 50 मेगावॅट क्षमतेच्या फ्लोटिंग सोलर प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. स्वच्छ ऊर्जेकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
तिरुचिरापल्लीमध्ये 5,650 कोटींचे प्रकल्प
केरळमधील कार्यक्रमानंतर पंतप्रधान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पोहोचतील. येथे ते सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. पेट्रोलियम क्षेत्रात BPCL च्या सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. सुमारे 3,680 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून नीलगिरी आणि इरोड जिल्ह्यांतील 8.8 लाख घरांपर्यंत पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पोहोचवण्याची योजना आहे. तसेच 201 CNG स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
ल्युब ब्लेंडिंग प्लांट राष्ट्राला समर्पित
याशिवाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या चेन्नईतील मणाली भागात उभारलेल्या 672 हजार टन क्षमतेच्या ल्युब ब्लेंडिंग प्लांटचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. सुमारे 1,490 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेला हा प्रकल्प देशातील ल्युब्रिकेंट उत्पादन क्षमता वाढवणार आहे. तसेच ग्रामीण संपर्क वाढवण्यासाठी 370 किलोमीटर लांबीच्या 89 ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासोबतच NH-81 वर गंगईकोंडा चोलापुरमजवळ ग्रीनफिल्ड बायपास उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.