'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

By कुणाल गवाणकर | Published: January 6, 2021 08:53 AM2021-01-06T08:53:38+5:302021-01-06T08:58:01+5:30

मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' पुस्तकाचं प्रकाशन

PM Modi should speak more in Parliament former president Pranab Mukherjee in book | 'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहमत असलेल्यांचे आवाज ऐकायला हवेत. विरोधकांना समजवण्यासाठी आणि देशातील जनतेला विविध विषयांची माहिती देण्यासाठी मोदींनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा. त्यांनी संसदेत जास्त बोलायला हवं,  असं मत दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' या पुस्तकात व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे संस्थेच्या कामकाजात बराच फरक पडतो, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे. 

देशात मनमोहन सिंग यांचं सरकार असताना प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाले. २०१४ मध्ये देशात सत्ताबदल झाला आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. त्यामुळे दोन पंतप्रधानांची कार्यशैली मुखर्जी यांनी जवळून पाहिली. याच कार्यकाळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' हे पुस्तक लिहिलं आहे. काल या पुस्तकाचं प्रकाशन झालं. 'जवाहरलाल नेहरू असो वा इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी किंवा मग मनमोहन सिंग, या सगळ्याच पंतप्रधानांनी सदनाला कायम आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली,' असं मुखर्जी यांनी त्यांच्या शेवटच्या पुस्तकात म्हटलं आहे.

संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री भूषवलेल्या प्रणव मुखर्जींनी त्यांच्या पुस्तकातून मोदींना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या पूर्वसुरींकडून प्रेरणा घ्यायला हवी. पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारला अनेकदा संसदीय संकटांचा सामना करावा लागला. अशी संकटं टाळण्यासाठी मोदींनी संसदेच्या कामकाजावेळी उपस्थित राहायला हवं,' असा मोलाचा सल्ला मुखर्जींनी दिला आहे.

पंतप्रधान मोदींनी असंतुष्टांचे आवाज ऐकायला हवेत. संसदेत जास्त वेळा बोलायला हवं. विरोधकांना समजावण्यासाठी आणि देशाशी संवाद साधण्यासाठी, नागरिकांना महत्त्वाच्या विषयांची माहिती देण्यासाठी त्यांनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा, असं मत मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. 'संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मी विरोधकांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्याही संपर्कात होतो. अनेक जटिल मुद्द्यांचं निराकरण करण्यासाठी हा संपर्क कामी यायचा,' असा अनुभव त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे.
 

Web Title: PM Modi should speak more in Parliament former president Pranab Mukherjee in book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.