अशांत जगासाठी सम्राट सम्प्रती संग्रहालयाचा संदेश महत्त्वाचा : पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:07 IST2026-04-01T13:06:18+5:302026-04-01T13:07:17+5:30
गांधीनगर: सध्या जग अशांततेच्या आगीत होरपळत असताना गुजरातमध्ये उभारण्यात आलेले सम्राट सम्प्रती संग्रहालय शांतता आणि अहिंसेचा सशक्त संदेश देते, ...

अशांत जगासाठी सम्राट सम्प्रती संग्रहालयाचा संदेश महत्त्वाचा : पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
गांधीनगर: सध्या जग अशांततेच्या आगीत होरपळत असताना गुजरातमध्ये उभारण्यात आलेले सम्राट सम्प्रती संग्रहालय शांतता आणि अहिंसेचा सशक्त संदेश देते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा संदर्भदेत मोदी म्हणाले की, संग्रहालयाचा वारसा आणि संदेश केवळ भारतासाठीच नव्हे, तर मानवतेसाठीही महत्त्वाचा आहे.
गांधीनगरजवळ कोबा गावातील श्री महावीर जैन आराधना केंद्र संकुलात उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. श्री महावीर जैन आराधना केंद्रामध्ये स्थित या संग्रहालयाला सम्राट अशोकाचे वंशज आणि मौर्य वंशाचे शासक सम्राट सम्प्रती महाराज (इ.स.पू. २२४-२१५) यांचे नाव देण्यात आले आहे.
भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भगवान महावीर यांच्या जयंतिनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. सत्य, सद्भाव आणि समानतेवर आधारित भगवान महावीर
यांच्या संदेशांतून अद्भुत अशी प्रेरणा मिळ, असे मोदी यांनी नमूद केले.
काय आहे संग्रहालयात ?
संग्रहालयात सध्या शतकानुशतके जुन्या, दुर्मीळ जैन कलाकृती आणि पारंपरिक वारसा सांगणाऱ्या वस्तू असून, यात कलाकुसर केलेल्या दगडी आणि धातूच्या मूर्ती, लघुचित्रे, चांदीचे रथ, विविध नाणी आणि प्राचीन हस्तलिखिते यांचा समावेश आहे. प्रशस्त अशा दालनांत दोन हजारांहून अधिक वस्तू ठेवलेल्या आहेत.
कोण होते सम्राट सम्प्रती ?
मौर्य वंशाचे सम्राट सम्प्रती हे सम्राट अशोक यांचे नातू होते. इ.स. पूर्व २२४ ते २१५ या काळात त्यांनी राज्य केले. पाटलीपुत्र ते अफगाणिस्तानपर्यंत त्यांचे राज्य होते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार केला; तर, सम्राट सम्प्रती यांनी अहिंसा व जैन धर्माचा प्रसार केला.