मिशन 400 पार; PM मोदी अॅक्शन मोडमध्ये, पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचे मॅरेथॉन दौरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 19:48 IST2024-03-03T19:48:15+5:302024-03-03T19:48:26+5:30
PM Modi LokSabha Election : उद्यापासून पंतप्रधान मोदींच्या मॅरेथॉन दौऱ्याला सुरुवात होत आहे.

मिशन 400 पार; PM मोदी अॅक्शन मोडमध्ये, पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचे मॅरेथॉन दौरे
PM Modi LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरातील झंझावाती दौरा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच पीएम मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू राज्यांच्या दौरा केला. त्यानंतर आता पीएम मोदींचे पुढील दहा दिवसही मॅरेथॉन दौरे होणार आहेत. या काळात पंतप्रधान मोदी कोणताही ब्रेक न घेता राज्यांना भेटी देतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, आणि पायाभरणीही करतील.
पुढील 10 दिवसांत, पंतप्रधान मोदी देशभरातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 29 कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. यामध्ये तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू आणि काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, येत्या 4 ते 7 मार्चदरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या पाच राज्यांचा मॅरेथॉन दौरा करणार आहेत.
यानंतर 8 मार्च रोजी पंतप्रधान दिल्लीतील पहिल्या राष्ट्रीय लेखक पुरस्कार सोहळ्यात सहभागी होतील. त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान आसामला जाणार आहेत. 9 मार्च रोजी पंतप्रधान अरुणाचल प्रदेशला भेट देतील. 10 मार्च रोजी पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशला दौऱ्यावर जातील आणि आझमगड येथे विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. 13 मार्च रोजी मोदींचा मॅरेथॉन दौरा संपेल. या दिवशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरात आणि आसाममधील 3 महत्त्वाच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करतील.