लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:28 IST2025-08-22T19:27:45+5:302025-08-22T19:28:22+5:30
पीएम मोदी यांनी कोलकाता येथील जाहीर सभेतून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकरावर जोरदार टीका केली.

लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
PM Modi in West Bengal: बिहार दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पोहोचले. येथे त्यांनी जेसोर रोड मेट्रो स्टेशनवरुन नोआपारा-जय हिंद विमानतळ मेट्रो सेवा, सियालदाह-एस्प्लानेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवांना हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकरावर जोरदार टीका केली.
रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 'आता लवकरच तृणमूल काँग्रेसचे सरकार जाणार आणि भाजपचे सरकार येणार. घुसखोरांनाही देशातून पळून जावे लागेल. आम्ही घुसखोरीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. मी लाल किल्ल्यावरुन एक मोठी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता घुसखोरीच्या वाढत्या धोक्याबद्दल आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील लोक वेळेपूर्वी विचार करतात, म्हणून मी तुमच्यामध्ये या मोठ्या राष्ट्रीय आव्हानावर सतत चर्चा करत आहे.'
घुसखोरांना भारतात राहू देणार नाही
'आम्ही घुसखोरांना भारतात राहू देणार नाही. म्हणूनच सरकारने घुसखोरांविरुद्ध एवढी मोठी मोहीम सुरू केली आहे. मला आश्चर्य वाटते की, तृणमूल काँग्रेस-काँग्रेससह काही राजकीय पक्ष तुष्टीकरणाला बळी पडले आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत. जोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे सरकार बंगालमध्ये आहे, तोपर्यंत बंगालचा विकास होणार नाही. म्हणूनच आज बंगालमधील प्रत्येक व्यक्ती म्हणत आहे, तृणमूल काँग्रेस गेल्यावरच खरा बदल येईल,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला
ते पुढे म्हणाले की, 'हे वर्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंतीचे आहे. भाजपचा जन्म डॉ. मुखर्जी यांच्या आशीर्वादाने झाला आहे. डॉ. मुखर्जी हे भारताच्या औद्योगिक विकासाचे जनक आहेत. दुर्दैवाने काँग्रेसने त्यांना याचे श्रेय कधीच दिले नाही. देशाचे पहिले उद्योग मंत्री म्हणून त्यांनी भारताचे पहिले औद्योगिक धोरण बनवले होते. आपण ते धोरण अवलंबले असते तर देशाचे चित्र वेगळे असते.'