PM Modi in Haldwani: माझा गेल्या ७ वर्षांचा रेकॉर्ड तपासून पाहा, जुन्या गोष्टी ठीक करण्यातच माझा वेळ जातोय; मोदींचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:02 IST2021-12-30T18:02:20+5:302021-12-30T18:02:55+5:30
PM Modi in Haldwani: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे आयोजित जाहीर सभेत तब्बल १७,५०० कोटी रुपयांच्या ...

PM Modi in Haldwani: माझा गेल्या ७ वर्षांचा रेकॉर्ड तपासून पाहा, जुन्या गोष्टी ठीक करण्यातच माझा वेळ जातोय; मोदींचा विरोधकांना टोला
PM Modi in Haldwani: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे आयोजित जाहीर सभेत तब्बल १७,५०० कोटी रुपयांच्या एकूण २३ योजनांची घोषणा केली. २३ योजनांमध्ये एकूण १४,१०० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या १७ प्रकल्पांचं भूमीपूजन देखील पार पडलं. यात सिंचन, रस्ते, आवास, आरोग्य सुविधा, उद्योग, स्वच्छता, पिण्याचं पाणी याच्याशी संबंधित सुविधांचा समावेश आहे. यावेळी उत्तराखंडमधील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपा सरकारच्या काळात झालेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. तसंच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
"हल्द्वानी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जवळपास २ हजार कोटी रुपयांची योजना इथं सुरू करणार आहोत. आता हल्द्वानीमध्ये पाणी, सांडपाणी, रस्ते, पार्किंग, रस्त्यावरचे दिवे अशा सर्व बाबींमध्ये अभूतपूर्व सुधारणा झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. यंदाचं दशक उत्तराखंडचं दशक ठरणार आहे. उत्तराखंडचा विकास वेगानं होणार आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
'माझा ७ वर्षांचा रेकॉर्ड तपासून पाहा'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी गेल्या सात वर्षांच्या कार्यकाळात कराव्या लागलेल्या कामांची माहिती देत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "माझा गेल्या ७ वर्षांच्या कारभाराचा रेकॉर्ड तपासून पाहा. मी जुन्या गोष्टी शोधून शोधून त्या दुरुस्त करण्याच्या मागे लागलो आहे. यातच माझा वेळ जात आहे. आता मी सर्व कामांची दुरुस्ती करत आहे. तुम्ही त्यांना (विरोधकांना) दुरूस्त करा", असं नरेंद्र मोदी म्हणाले. केंद्र सरकारनं नैनीताल येथील देवस्थानावर भारतातील सर्वात मोठा ऑप्टिकल टेलिस्कॉप देखील उभारला असल्याचं मोदींनी यावेळी आवर्जुन सांगितलं. यामुळे देशातील सर्व शास्त्रज्ञांना नवी सुविधा मिळत आहे आणि या परिसराला नवी ओळख मिळाली आहे, असंही ते म्हणाले.
उत्तराखंडमध्ये औद्योगिक क्षमतेत वाढ
हल्द्वानी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जवळपास २ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. तसंच "उत्तराखंड नद्यांचं राज्य आहे. इथं बहुतांश नद्यांचा उगम होतो. तरीही हे राज्य विकासात मागे का? असा प्रश्न मला पडतो. येथील जनतेनं स्वातंत्र्यापासूनच केवळ दोन विचारधारा पाहिल्या आहेत. एक विचारधारा आहे ती म्हणजे पर्वतरागांमधील भागांना दुर्लक्षित ठेवण्याची आणि दुसरी म्हणजे पर्वतरांगांमधील छोट्या छोट्या प्रदेशांचा विकास व्हावा यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्यांची. आमचं सरकार सबका साथ, सबका विकास याच मंत्रावर चालत आहे", असंही मोदी म्हणाले.