टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 21:49 IST2025-04-18T21:44:30+5:302025-04-18T21:49:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांच्या फोनवरुन चर्चा झाली.

टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
PM Modi-Elon Musk Talk: पंतप्रधान मोदींनी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्टवरुन याबद्दल माहिती दिली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत-अमेरिका भागीदारीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर मस्क यांची कंपनी टेस्ला आणि स्टारलिंक यांच्या भारतात गुंतवणुकीबद्दल चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी टेस्लाचे संचालक एलॉन मस्क यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या वर्षीच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट क्षमतेबद्दल आम्ही चर्चा केली. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी वाढवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. दोघांमधील चर्चेच सध्या जगभरात चर्चा आहे.
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. स्पेसएक्सचे सीईओ मस्क हे त्यांच्या तीन मुलांसह अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अतिथीगृहात पंतप्रधान मोदींना भेटले होते. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इन्स्टा पोस्टमध्ये, मस्क यांच्यासोबतच्या भेटीत त्यांनी अवकाश, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सांगितले होते.
या वर्षी मार्चमध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओनेही एक घोषणा केली होती. भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी जिओ आणि स्पेस एक्स यांच्यात करार झाला आहे, असं जिओने म्हटलं होतं. सुनील भारती मित्तल यांच्या कंपनी भारती एअरटेलनेही स्पेसएक्ससोबत असाच करार केला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यात ही चर्चा झाली आहे. सध्या तरी ट्रम्प यांनी या निर्णयावर पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि चीनमध्ये 'टॅरिफ वॉर'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठे कर लादले आहेत. अमेरिकेने चीनवर २४५ टक्के कर लादला आहे. त्याच वेळी, चीनने अमेरिकेवर १२५ टक्के कर लादला आहे.Spoke to @elonmusk and talked about various issues, including the topics we covered during our meeting in Washington DC earlier this year. We discussed the immense potential for collaboration in the areas of technology and innovation. India remains committed to advancing our…
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2025