विमानतळावर उतरताच पंतप्रधान मोदींनी 'त्या' तीन अधिकाऱ्यांशी केली चर्चा; समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:27 IST2025-04-11T14:11:48+5:302025-04-11T14:27:13+5:30
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर असताना त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

विमानतळावर उतरताच पंतप्रधान मोदींनी 'त्या' तीन अधिकाऱ्यांशी केली चर्चा; समोर आली माहिती
PM Modi in Varanasi: शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा मतदारसंघ वाराणसीला पोहोचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीतील बाबतपूर विमानतळावरील एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी विमानतळावरच काही अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. या फोटोमागचे सत्य आता समोर आलं आहे. त्यांच्या संसदीय मतदारसंघात घडलेल्या एका सामूहिक बलात्कार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सविस्तर माहिती घेतली. पीडित विद्यार्थिनीवर २३ मुलांनी ७ दिवस सामूहिक बलात्कार केला होता. यापैकी काही आरोपींनी अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी १०:०७ वाजता वाराणसीला पोहोचले. विमानतळावर उतरताच पंतप्रधानांनी पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांना विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत प्रश्न विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावरच काशी पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेची माहिती घेतली आणि कडक सूचना दिल्या. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
शुक्रवारी पंतप्रधान वाराणसी विमानतळावर पोहोचले तेव्हा प्रोटोकॉलनुसार, वाराणसीचे तिन्ही उच्च अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांकडून वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. पंतप्रधान मोदींनी कारवाई कुठपर्यंत पोहोचली याबाबत अधिकाऱ्यांना विचारले आणि या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. "पंतप्रधान मोदींनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, वाराणसीत १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अंमली पदार्थ दिला आणि तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणात सोमवारपर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली होती. १३ आरोपी अजूनही फरार आहेत. पंतप्रधान मोदी या प्रकरणाबाबत गंभीर असून त्यांनी स्वतः विमानतळावर उभे राहून पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती जाणून घेतली.