श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:07 IST2025-03-03T18:07:08+5:302025-03-03T18:07:26+5:30

गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाईत दहशतवादी अब्दुल रहमानला अटक केली असून, त्याच्याकडून हातबॉम्ब जप्त केले आहेत.

Plot to attack Shri Ram temple; Suspect arrested from Faridabad, trained by ISI | श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण

श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण

Ayodhya Ram Mandir : गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन एका तरुणाला अटक केली आहे. अब्दुल रहमान (19) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. संशयिताला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन हातबॉम्बही जप्त करण्यात आले आहेत.

टार्गेट राम मंदिर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित अब्दुल रहमान हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखत होता. रेहमान अनेक कट्टरवादी गटांशी संबंधित असून, फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीनंतर आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती, ज्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर प्रमुख टार्गेट आहे.

राम मंदिराची रेकी अन् हल्ल्याचा कट
अब्दुल रहमानने यापूर्वीही अनेकवेळा अयोध्येतील राम मंदिराची रेकी केली होती आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची माहिती आयएसआयला दिली होती, असेही तपासात समोर आले आहे. राम मंदिरावर हँडग्रेनेडने हल्ला करुन मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. ही कारवाई करण्यात गुजरात एटीएसची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एटीएसला एक संशयित दहशतवादी भारतात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने सापळा रचून संशयिताला अटक केली.

संशयिताला कसे पकडले?
अब्दुल रहमान फैजाबादहून ट्रेनने फरीदाबादला पोहोचला होता, तिथे एका हँडलरने त्याला हँडग्रेनेड दिले. ट्रेनने अयोध्येला परतायचे आणि तिथे हल्ला करायची योजना होती. मात्र त्याआधीच सुरक्षा यंत्रणांना इनपुट मिळाले आणि गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत रविवारी अब्दुल रहमानला पकडले. सध्या हरियाणा पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा अब्दुल रहमानची कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडील मोबाईल आणि इतर जप्त केलेल्या साहित्याची तपासणी केली जात आहे. या कटात आणखी कोण सामील होते आणि स्थानिक मदतनीसही त्यात सामील होते का, याचाही तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

Web Title: Plot to attack Shri Ram temple; Suspect arrested from Faridabad, trained by ISI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.