फलाट १२चा १६ केला अन् होत्याचे नव्हते झाले; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ वर, चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 05:35 IST2025-02-17T05:33:37+5:302025-02-17T05:35:07+5:30
१२ हून अधिक गंभीर जखमी आहेत.

फलाट १२चा १६ केला अन् होत्याचे नव्हते झाले; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ वर, चौकशीचे आदेश
नवी दिल्ली : महाकुंभला रवाना होणाऱ्या विशेष रेल्वे गाठण्यासाठी दिल्ली स्थानकावर जमलेल्या हजारो भाविकांसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली. प्रचंड गर्दी आणि अचानक दोन विशेष रेल्वे रद्द झाल्या. वर नियोजित रेल्वेचा फलाट ऐनवेळी १२च्या ऐवजी १६ करण्यात आला आणि भाविकांची एस्केलेटरवरून नियोजित फलाट गाठण्यासाठी पळापळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरीत १८ जणांचे जीव गेले. १२ हून अधिक गंभीर जखमी आहेत.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका कुलीने हे वास्तव वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विशेष रेल्वेचा फलाट बदलल्याची उद्घोषणा होताच भाविक त्या दिशेने पळू लागले आणि समोरून येणारा जमाव आणि १६ क्रमांकाच्या फलाटाकडे पळणारा जमाव समोरासमोर आला. यातून चेंगराचेंगरी सुरू झाली. यात जे पडले ते तुडवले गेले.
अशी घडली दुर्घटना
स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस व भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस विलंबाने धावत होती. या रेल्वे गाड्यांचे प्रवासी १२, १३, १४ क्रमांकाच्या फलाटावर होते. प्रयागराज एक्स्प्रेस फलाट क्र. १४वर उभी होती. अगोदरच प्रवासी तेथे गर्दी करून होते. अचानक प्रयागराज स्पेशल गाडी फलाट १६वर येत असल्याची घोषणा झाली व प्रवासी तिकडे धावत सुटले. यादरम्यान असलेला एक एस्केलेटर काळ ठरला. इथे चेंगराचेंगरीत अनेकांचे प्राण गेले.
गाड्यांच्या नावांमुळे घोळ, चौकशीत कारण आले पुढे
महाकुंभकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांची नावे प्रयागराजने सुरू होतात. यात फलाट १४वर प्रयागराज एक्स्प्रेस थांबलेली होती आणि उद्घोषणा झाली ‘प्रयागराज स्पेशल’ची.
ही गाडी फलाट १६वर लागणार म्हटले की, दोन्ही फलाटावरील प्रवासी गोंधळले व परस्परांच्या विरुद्ध दिशेने पळत सुटले. चौकशीत घटनेचे हेच प्रमुख कारण असल्याचे समोर आले.
रेल्वेकडून मदतीची घोषणा
रेल्वेने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदतीची घोषणा केली. किरकोळ जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये दिले जातील. याशिवाय बिहार सरकारनेही रोख मदतीची घोषणा केली आहे.