विमानाचे शेपूट सापडले
By Admin | Updated: January 7, 2015 23:57 IST2015-01-07T23:57:04+5:302015-01-07T23:57:04+5:30
एअर आशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शेपटाकडील भाग बुधवारी जावा समुद्रात सापडला. त्यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे.

विमानाचे शेपूट सापडले
जकार्ता/सिंगापूर : एअर आशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शेपटाकडील भाग बुधवारी जावा समुद्रात सापडला. त्यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे.
आम्हाला विमानाचे शेपूट सापडले आहे. आम्ही आता ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. सापडलेले अवशेष हे विमानाचे शेपूट असल्याचे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो, कारण त्यावर एअर आशियाची खूण आहे, असे इंडोनेशियाच्या शोध व बचाव मोहिमेचे प्रमुख बाम्बंग सोएलियस्तो यांनी सांगितले.
विमानाचा संपर्क जेथे तुटला तेथून ३० कि.मी. अंतरावर विमानाचा पाठीमागील भाग आढळून आला. विमानाच्या शेपटाकडील भागातच ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्समधून विमानाचा वेग, लँडिंग गीअरची स्थिती आणि वैमानिकाच्या संवादाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे विमान दुर्घटनेच्या चौकशीत नेहमीच ब्लॅक बॉक्सला एक महत्त्वपूर्ण पुरावा मानले जाते.
पाण्यात शोधकार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राने विमानाचा पाठीमागील भाग हुडकून काढला. त्यानंतर सूरमाऱ्यांनी तेथे जाऊन त्याची ओळख पटविली. एअर आशियाचे क्यूझेड ८५०१ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यापासून आतापर्यंत ४० मृतदेह हाती लागले आहेत. विमानात एकूण १६२ प्रवासी होते. २८ डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या या विमानाचे अवशेष हुडकून काढण्यासाठी जावा समुद्रात शोधमोहीम सुरू आहे. (वृत्तसंस्था)
विमानाचे शेपूट सापडल्याचे एअर आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांनी टष्ट्वीटरवर म्हटले आहे. विमानाच्या पाठीमागचा योग्य भाग सापडला असेल तर त्यात ब्लॅक बॉक्स असतील. आम्हाला विमानाच्या सर्व भागांचा लवकरात लवकर शोध घ्यायचा आहे, जेणेकरून उर्वरित मृतदेह हुडकून मृतांच्या कुटुंबियांच्या वेदना कमी करता येऊ शकतील, असेही त्यांनी टष्ट्वीटरवर म्हटले आहे.