उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 23:07 IST2025-07-23T23:07:29+5:302025-07-23T23:07:48+5:30
Ahmedabad Airport News: गेल्या महिन्यात अहमदाबादमधील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आज अहमदाबाद विमानतळावर एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला.

उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला
गेल्या महिन्यात अहमदाबादमधीलविमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाला उड्डाण केल्यानंतर काही क्षणात झालेल्या अपघातात विमानातील प्रवासी, कर्मचारी आणि विमान कोसळले त्या ठिकाणच्या व्यक्ती अशा मिळून सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आज अहमदाबादविमानतळावर एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. अहमदाबाद येथून दीव येथे जाण्यासाठी उड्डाण करत असलेल्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनाला अचानक आग लागली. या विमानामधून सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच वैमानिकाने मेडे कॉल दिला आणि विमानाचं उड्डाण तातडीने थांबवलं.
त्यानंतर विमानामधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तातडीने सुखरूपपणे उतरवण्यात आले. तसेच या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. दरम्यान, इंडिगोच्या प्रवक्त्याने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगितले. हे विमान अहमदाबाद विमानतळावरून सकाळी ११ वाजता उड्डाण करणार होते.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एटीसीकडून क्लियरन्स मिळाल्यानंतर विमानाने धावपट्टीवरून उड्डाण करण्यास सुरुवात केली होती. मात्र तेवढ्यात विमानाच्या इंजिनामध्ये आग लागली. त्यानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला. त्यानंतर विमानाचं उड्डाण तातडीने रोखण्यात आले. त्यानंतर विमानातील प्रवासांना बाहेर काढण्यात आले. आता हे विमान पुन्हा वापरात आणण्यापूर्वी त्याची आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल, असे इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच कंपनींने ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.