राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एक मोठा विमानअपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. चुरू जिल्ह्यातील रतनगड क्षेत्रात असलेल्या भानूदा गावात हा विमानअपघात झाला असून, या अपघाताबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातग्रस्त विमान हे हवाई दलाचं असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, घटनास्थळाजवळून दोन मृतदेहही सापडले आहेत.
या अपघातातबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार आकाशात मोठा स्फोट झाल्यानंतर हे विमान गावाजवळ असलेल्या शेतामध्ये कोसळले. त्यानंतर अपघातस्थळावरून आगीच्या ज्वाळा आणि धूराचे लोट हवेत उसळताना दिसले. ग्रामस्थांनी अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आलं नाही. दरम्यान, हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाकडील जग्वार प्रकारातील लढाऊ विमान असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातग्रस्त विमानाजळ दोन मृतदेह सापडले आहेत . त्यातीत एक मृतदेह हा पूर्णपणे छिन्नविच्छिन्न स्थितीत असून, या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान, विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रतनगडमधील प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.