श्रीनगर : दिल्लीहून श्रीनगरला २२० प्रवासी घेऊन जाणारे इंडिगोचे विमान गारपिटीमध्ये अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. वैमानिकाने तातडीने श्रीनगर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्याबाबत कळवले. नंतर सुदैवाने विमान सुखरूप उतरवण्यात आले; परंतु तोपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
या घटनेचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून, विमानात घाबरलेले प्रवासी प्रार्थना करताना दिसत आहेत. काही प्रवासी आक्रोश करतानाही दिसत आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोच्या विमानात (क्र. ६ ई २१४२) खराब हवामानामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याची माहिती वैमानिकाने दिली. त्यानंतर विमान सायंकाळी ६:३० वाजता श्रीनगर येथे सुरक्षितपणे उतरले. यातील सर्व चालक दल व प्रवासी सुखरूप आहेत.