भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:03 AM2019-09-19T06:03:21+5:302019-09-19T06:03:54+5:30

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना

 Plan to write an official history of India's borders | भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची योजना

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची योजना

Next

नवी दिल्ली : भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना असून, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हे काम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वंकष स्वरूपाचा हा इतिहास येत्या दोन वर्षांत लिहून पूर्ण होणे अपेक्षित आहे.
संरक्षण मंत्रालयाने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले : भारताच्या सीमा कशा ठरविल्या गेल्या व त्यात वेळोवेळी कसे बदल होत गेले, यासह सीमेसंबंधीच्या सर्व पैलूंचा आंतर्भाव करून हे इतिहास लेखन करण्याचा प्रस्ताव आहे. सीमांच्या संदर्भात सुरक्षा दलांची भूमिका, तसेच सीमा भागांमधील लोकांची वांशिक पृष्ठभूमी, जीवनशैली, संस्कृती यांचाही यात समावेश असेल. यासंदर्भात राजनाथसिंग यांनी मंगळवारी भारतीय इतिहास संशोधन परिषद, नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय, पुरातत्त्व महासंचालनालय आणि संरक्षण, गृह व परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
सर्वसामान्य नागरिकांना व खास करून सरकारमधील अधिकाऱ्यांना देशाच्या सीमा व तेथील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान व्हावे यासाठी हे इतिहास लेखन महत्त्वाचे आहे, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. यासाठी सूचनांचे स्वागत केले जाईल, असे सांगून त्यांनी अधिकाºयांना निर्देश दिले की, या इतिहास लेखनासाठी कोणत्या संदर्भसाधनांचा उपयोग करावा, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी, ढोबळ रूपरेखा काय असावी व याचे कसे नियोजन करावे, यासंदर्भात अधिकाºयांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.
>पाक, चीनला लागून असलेल्या सीमांचा वाद
भारताच्या खासकरून पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे व सीमांची नेमकी आखणी कशी व कुठे आहे, याविषयी एकवाक्यता नसल्याने तंटे-बखेडे होत असतात. जम्मू-काश्मीरची सीमा हा तर मोठ्या संघर्षाचा विषय बनला आहे. चीननेही भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. या घडामोडींचे सामान्य नागरिकांना नीट आकलन व्हावे यासाठी हा इतिहास उपयुक्त ठरेल.

Web Title:  Plan to write an official history of India's borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.