'काही नुकसान होईल, पण भारत...' अमेरिका-इराण संघर्षावर पियुष गोयल यांची महत्वाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:54 IST2026-03-15T13:53:43+5:302026-03-15T13:54:28+5:30
US-Iran तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात LPG टंचाईची भीती? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले...

'काही नुकसान होईल, पण भारत...' अमेरिका-इराण संघर्षावर पियुष गोयल यांची महत्वाची प्रतिक्रिया
Piyush Goyal On Fuel Crisis : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे तेल-गॅस बाजारावर गंभीर परिणाम पडला असून, अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतातही एलपीजी (LPG) पुरवठा खंडित होईल, या भीतीने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सिलेंडर बुकिंग केली जात आहेत. मात्र, केंद्र सरकारने देशात तेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
मी ज्योतिषी नाही, पण भारत सक्षम- पीयूष गोयल
एका वृत्त वाहिनीच्या पुरस्कार समारंभात बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारतात कोणतेही मोठे इंधन संकट उद्भवणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, अमेरिका-इराण संघर्षामुळे भारताला अल्पकालीन आर्थिक परिणाम सहन करावे लागू शकतात. मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत असून, भारत या आव्हानांवर मात करेल. सध्या युद्धाची परिस्थिती आहे. मी ज्योतिषी नाही, त्यामुळे हे युद्ध किती काळ चालेल हे सांगू शकत नाही. मात्र भारतातील लोकांना माहिती आहे की, हे एक आव्हान आहे आणि आपण ते नक्की पार करू.
भारतात तेल संकटाची शक्यता नाही
जागतिक ऊर्जा संकटाबाबत बोलताना गोयल यांनी भारतात तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होईल, या शक्यतेला नकार दिला. त्यांनी सांगितले की, देशाकडे कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारतीय रुपयावर दबाव येत असल्याच्या चर्चेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. युद्धामुळे काही काळ आर्थिक क्रियाकलापांवर परिणाम होऊ शकतो, परंतु पुढील काही महिन्यांत त्याची भरपाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
LPG पुरवठ्याबाबत सरकारचे स्पष्टीकरण
भारतामध्ये एलपीजी टंचाई निर्माण होईल का? या प्रश्नावर पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की, एलपीजी पुरवठ्यात काही विलंब झाल्यास सरकारने केरोसिन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच भारत विविध देशांकडून आयात करून LPG आणि LNG ची गरज पूर्ण करत आहे. त्यांनी सांगितले की, भारतात गॅसची खेप पोहोचण्यासाठी साधारणतः तीन ते चार दिवस लागतात आणि जास्तीत जास्त सात दिवसांत पुरवठा होऊ शकतो.
भारत पुढील दोन दशके वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
सध्याची भू-राजकीय परिस्थिती भारतासाठी एक इशारा असला तरी, भारताने प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदलण्याची क्षमता दाखवली आहे, असेही गोयल म्हणाले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, पुढील किमान दोन दशके भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील.