pilot should take responsibility for my sons defeat said ashok gehlot | 'पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी'
'पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी'

ठळक मुद्देपराभवानंतर आता राजस्थान काँग्रेसमधील वाद समोर येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते.

जयपूर - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. पराभवानंतर आता राजस्थान काँग्रेसमधील वाद समोर येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. 

सचिन पायलट यांनी आपला मुलगा वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी घ्यायला हवी असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. एबीपी या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गेहलोत बोलत होते. वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत गेहलोत यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. 

जोधपूरच्या जागेसाठी वैभव यांच्या नावाची शिफारस सचिन पायलट यांनी केली होती हे खरे आहे का? असा प्रश्न गेहलोत यांना विचारण्यात आला होता. त्यावर गेहलोत यांनी 'पायलट यांनी माझ्या मुलाचे नाव सुचविले असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे. यावरूनच आमच्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाही हे स्पष्ट होते' असं म्हटलं. तसेच 'वैभव हे मोठ्या फरकाने जिंकतील असे पायलट यांनीच म्हटले होते, याचे कारण म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचे 6 आमदार आहेत. आमचा निवडणूक प्रचारही उत्तम होता. त्यामुळेच सचिन पायलट यांनी वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मला वाटते की ही एक सामूहिक जबाबदारी आहे' असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.  

काँग्रेसच्या पराभवाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत जबाबदार असल्याचं पायलट समर्थक बोलू लागले होते. त्यावर गेहलोत यांनी 'प्रत्येकालाच पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल. एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याचे श्रेय सर्वांनाच हवे असते. मात्र पराभवाचे वाटेकरी कोणीच होऊ इच्छित नाही. ही निवडणूक तर सामूहिक नेतृत्वात झाली आहे' असं म्हटलं आहे. वैभव गेहलोत यांचा केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सुमारे 4 लाख मतांनी पराभव केला आहे. 

मोदींची फेरनिवड झाल्यास ती ठरेल शेवटची निवडणूक - अशोक गेहलोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्या पदावर फेरनिवड झाल्यास ती या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, अशी भीती काही महिन्यांपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली होती. मोदी निवडून आल्यास चीन व रशियामध्ये जसा एकछत्री अंमल असतो, त्या दिशेने भारताची वाटचाल सुरू होईल, असेही ते म्हणाले होते.त्यांनी सांगितले की, मोदींच्या राजवटीत लोकशाही, तसेच देशाचे अस्तित्व यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोदी पाकिस्तानशीही युद्ध पुकारू शकतात, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. अशोक गेहलोत यांनी म्हणाले होते की, चीन, रशियामध्ये एकाच पक्षाची सत्ता असते. तिथे जो राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान बनतो, त्याच्या हाती निर्णय घेण्याचे अधिकार एकवटलेले असतात. तशीच परिस्थिती मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास भारतामध्ये उद्भवू शकते. निवडणुका जिंकण्यासाठी व निवडणुकांनंतर मोदी आपले इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

 


Web Title: pilot should take responsibility for my sons defeat said ashok gehlot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.