पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:46 IST2019-06-19T15:44:55+5:302019-06-19T15:46:23+5:30
एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात.

पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर
नवी दिल्ली : सोमवारी बंगळुरुहून कोलकाता जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला दोन तासांचा उशीर झाला. यामागचे कारणही क्षुल्लक होते. पायलटने विमानातील कर्मचाऱ्याला जेवणाचा डबा धुण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांच्यात प्रवाशांसमोरच वादावादी झाली. याचे पर्यावसान धक्काबुक्कीमध्ये झाल्याने दुसरा पायलट आणि कर्मचारी शोधेपर्यंत विमानाला दोन तासांचा उशीर झाला.
एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात. कधी मागवलेला बर्गर उशिराने आल्याने विमानाला उशीर तर कधी तांत्रिक कारणे यामुळे ही विमानसेवा कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीतर विमानाच्या आसनक्षमतेपेक्षा तिकिटे वाटल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला होता. सोमवारची घटनाही सरकारी विमान कंपनीची प्रतिमा मलिन करणारीच ठरली.
पायलटने डबा धुण्यास सांगितल्याचा राग पर्सर म्हणजेच हिशेब ठेवणाऱ्या अधिकाऱ्यास आला. यानंतर त्यांच्यामध्ये सुरु झालेला वाद थांबायचे नाव घेईना. प्रकरण हातघाईवर आले. प्रवाशांसमोरच त्यांच्यात धक्काबुक्की सुरु झाली. शेवटी क्रू मेंबरनी वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिल्याने दोघांना विमानातून खाली उतरविण्यात आले. मात्र, हे विमान उडविण्यासाठी एअर इंडियाकडे दुसरा पायलट आणि पर्सर नव्हता. त्यांची व्यवस्था करण्यात एअर इंडियाला दीड तास गेले. यानंतर विमानाने उड्डाण केले.
या झालेल्या प्रकाराची चौकशी एअर इंडिया आणि डीजीसीए करत आहेत. चौकसी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने घरून डबा आणला होता. तो त्याने गरम करण्यास दिला होता. डबा खाऊन झाल्यानंतर पायलटने त्याच कर्मचाऱ्याला डबा धुण्यास सांगितले. याला त्या कर्मचाऱ्याने नकार देताच वादाला तोंड फुटले.