अमरावती : डॉलरच्या तुलनेत रुपयाची दिवसेंदिवस घसरण होत आहे. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसांत पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर दराने मिळू लागले तर आश्चर्य वाटणार नाही अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारची खिल्ली उडविली आहे.नायडू यांनी काही महिन्यांपूर्वीच एनडीएपासून फारकत घेतली आहे. तेव्हापासून नायडू मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. सध्या आपण नेमके कुठे चाललो आहोत हेच कळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पेट्रोलचा लिटरमागे असलेला दर नक्कीच शंभरी गाठेल. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरणही शंभरी पार करण्याची शक्यता आहे. त्यावेळी डॉलर मोजूनच पेट्रोल खरेदी करावे लागेल असे दिसते' असे उपरोधिक उद्गारही त्यांनी काढले. अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. विकासदरही घटला आहे. देशात वित्तीय शिस्त उरलेली नाही असेही नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)
पेट्रोल आणि रुपयाही जाईल शंभरावर! चंद्राबाबू नायडू यांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:34 IST