Animal Cruelty: हैदराबादमधून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने श्वानाच्या पाच पिल्लांची निर्घृणपणे हत्या केली आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीने अपार्टमेंटच्या कार पार्किंगमध्ये ५ नवजात पिल्लांची निर्घृण हत्या केली. श्वान प्रेमी असलेल्या या व्यक्तीने त्याच्या श्वानाला पाहून इतर पिल्ले भुंकू लागल्याने रागाच्या भरात हा सगळा प्रकार घडला. रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर त्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे आरोपी पिल्लांना रागाच्या भरात फेकताना दिसत आहे.
हैदराबादच्या फतेहनगरमधील होम व्हॅलीमध्ये हा सगळा प्रकार घडला. एका अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंग एरियामध्ये एका माणसाने पाच नवजात पिल्लांना भिंतीवर आणि जमिनीवर आपटून आणि दगडांनी ठेचून ठार मारले. व्यापारी आशिष त्याच्या पाळीव श्वानासोबत फिरायला निघाला होता आणि अचानक काही पिल्ले त्याच्या पाळीव कुत्र्यावर भुंकू लागली. हे पाहून आशिषला राग आला आणि त्याने पाच पिल्लांना भिंतीवर आणि जमिनीवर आदळून संपवले.
इंडिस व्हीबी निवासी अपार्टमेंटच्या पार्किंगमधले धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. फुटेजमध्ये आशिष त्याच्या श्वानासोबत फिरताना दिसत आहे. आशिषचे श्वान नवजात पिल्लाजवळ येते. त्यानंतर आशिष त्या लहान पिल्लाला उचलतो आणि जमिनीवर फेकतो. मग तो गुडघ्यावर बसतो. पिल्लू जिवंत आहे की नाही ते तपासतो. मग आशिष त्या पिल्लाला पायाखाली चिरडतो. त्यानंतर काही पिल्लांना त्याने उचलून फेकून दिले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. त्यावेळी चही पिल्ले पार्किंगमध्ये मृतावस्थेत आढळली आणि त्यांच्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या.
सुरुवातीला जेव्हा आशिषकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की तो त्या पिल्लांना त्याच्या श्वानाजवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही दिसून आले. शेजाऱ्यांनी आशिषला जेव्हा त्या पाच पिल्लांनी तुझं काय नुकसान केलं असं विचारले तेव्हा त्याच्याकडे बोलायला काहीच नव्हते. त्यानंतर आशिषने आपण पाच पिल्लांची हत्या केल्याची कबुली दिली. मी त्यांना दगडाने मारले आणि भिंतीवर फेकले, असेही आशिषने सांगितले.