बँकेचा कारनामा! कर्ज फेडल्यावरही 6 वर्षांनी पाठवली नोटीस; व्यक्तीला बसला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 11:44 IST2024-03-11T11:36:55+5:302024-03-11T11:44:05+5:30
व्यक्तीने बँकेकडून 75 हजार रुपयांचे कर्ज घेतलं व ते सहा वर्षांपूर्वी फेडलं. पण त्याच्यासोबत आता असं काही घडलं आहे की त्याला काय करावं हेच समजत नाही.

बँकेचा कारनामा! कर्ज फेडल्यावरही 6 वर्षांनी पाठवली नोटीस; व्यक्तीला बसला मोठा धक्का
एका व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतले, पण त्याच्यासोबत एवढा मोठा घोटाळा होईल, असा विचारही केला नसेल. व्यक्तीने बँकेकडून 75 हजार रुपयांचे कर्ज घेतलं व ते सहा वर्षांपूर्वी फेडलं. पण त्याच्यासोबत आता असं काही घडलं आहे की त्याला काय करावं हेच समजत नाही. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला बँकेकडून कर्जासाठी नोटीस मिळाली आहे.
व्यक्तीने 6 वर्षांपूर्वी संपूर्ण कर्ज फेडलं होतं. परंतु असे असतानाही बँक त्याला नोटीस पाठवून कर्जाची परतफेड करण्यास सांगत आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर तरुणाने आता अधिकाऱ्याला लेखी अर्ज देऊन याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. हे प्रकरण बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील मेहसोनी गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहसोनी गावात राहणारे निरंजन कुमार यांनी बँक ऑफ इंडियाच्या लखीसराय शाखेतून 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
किसान क्रेडीट कार्डचे कर्ज घेतल्यानंतर निरंजन यांनी बँकेशी कराराच्या आधारे 9 जानेवारी 2018 रोजी 17 हजार रुपयांची सेटलमेंट करून कर्जाची परतफेड केली होती. पैसे जमा केल्यानंतर बँकेकडून ड्यू सर्टिफिकेट देण्यात आले. कर्ज फेडल्यानंतरही कर्ज जमा करण्यासाठी 9 मार्च रोजी नोटीस पाठविण्यात आली आहे.
बँकेकडून पुन्हा नोटीस मिळाल्यानंतर निरंजन कुमार यांनी आता अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. याबाबत बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक म्हणाले की, जुन्या प्रकरणात नाव चुकून वगळल्याने नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी बँकेत येऊन हे प्रकरण सोडवावं यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.