The people of Kashmir are in support of China, Raut said on Farooq Abdullah's statement ... | काश्मीरचे लोकं चीनच्या समर्थनार्थ म्हणणाऱ्या फारुक अब्दुलांना संजय राऊतांचा सल्ला

काश्मीरचे लोकं चीनच्या समर्थनार्थ म्हणणाऱ्या फारुक अब्दुलांना संजय राऊतांचा सल्ला

ठळक मुद्देफारुक अब्दुलांनी नेमकं कशामुळे असं वक्तव्य केलं हे पाहावं लागेल. देशाचे गृहमंत्री अमित शहांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आले आहे.

मुंबई - कोरोना कालावधील देशातील पहिली विधानसभा निवडणूक पार पडत असून बिहार निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, कोरोनाच्या संकटात सध्या बिहार निवडणुकांची गरज होती का? असा प्रश्न विचारला आहे. यावेळी, फारुक अब्दुलांनी काश्मीरमधील नागरिकांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी फारूक अब्दुल्लांना काश्मीरमध्ये जनजागृती करण्याचा सल्ला दिलाय.

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार  फारुक अब्दुल्ला यांनी काश्मीर लोक स्वत:ला भारतीय मानत नाही, ना त्यांना भारतीय व्हायचं आहे. भारताऐवजी चीनने त्यांच्यावर शासन करावं असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी असं विधान का केलं, हे पाहावं लागेल, असे राऊत यांनी म्हटलंय. 

''फारुक अब्दुलांनी नेमकं कशामुळे असं वक्तव्य केलं हे पाहावं लागेल. देशाचे गृहमंत्री अमित शहांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आले आहे. त्यानंतर, पुढील मिशन पाकव्याप्त काश्मीर असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे, यात भारत आणि पाकिस्तानचा विषय असून चीनचा विषय येतोच कुठे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, फारुक अब्दुल्ला हे देशाचे प्रमुख नेते असल्याने त्यांनी काश्मीरमध्ये जनजागृती करणे गरजेचं आहे,'' असेही राऊत यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते फारुक अब्दुल्ला

एका मुलाखतीत फारुक अब्दुल्ला म्हणाले की, तुम्ही जर काश्मिरींशी चर्चा केली तर अनेकांना चीनने भारतात यावं असं वाटत आहे. आपण तेथे जा आणि कोणाशीही बोला. ते स्वत: ला हिंदुस्तानी किंवा पाकिस्तानी मानत नाहीत. चीनने त्यांच्यावर राज्य करावे अशी त्यांची इच्छा आहे. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक आहे, मागील वर्षी ५ ऑगस्टला मोदी सरकारने जे केलं त्याचे शेवटचं केलं असे त्यांनी सांगितले. काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्‍या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The people of Kashmir are in support of China, Raut said on Farooq Abdullah's statement ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.