'लोक कोरोनाकडे दुर्लक्ष करू लागलेत, तिसरी लाट केव्हाही धडक देईल'; शास्त्रज्ञांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:15 IST2021-07-15T18:13:52+5:302021-07-15T18:15:04+5:30
देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत.

'लोक कोरोनाकडे दुर्लक्ष करू लागलेत, तिसरी लाट केव्हाही धडक देईल'; शास्त्रज्ञांचा इशारा
देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. सार्वजनिक आणि पर्यटन स्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवत लोक गर्दी करत आहेत. यावर शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी समाजाची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि सध्या लोक संकट पाहू शकत नाहीतयत असं दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या वृत्ती बदल करण्यासाठी सरकारची भूमिका अतिशय महत्वाची असते. पण दुर्दैवानं देशातील जनतेचा राजकीय पक्षांवर खूप कमी विश्वास राहिला आहे, असंही स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना प्रादुर्भावाचं गांभीर्य आणि लसीकरणाच्या वेगाचा दराबाबतच्या अस्पष्ट भूमिकेमुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये डोंगराळ भागातील पर्यटन स्थळांवर लोक गर्दी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचंही दिसून आलं आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून आपलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याच्या भानगडीत लोक संकटाला निमंत्रण देत आहेत, असं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष करणं, नियमांबाबत लोकांची उदासीन वृत्ती आणि जे होईल ते देवाच्या मर्जीनं होईल अशा भावनेतून वागणं घातक ठरू शकतं, असं साथरोग तज्ज्ञ ललित कांत यांनी म्हटलं. मास्क न वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणं यातून लोकांना समोरील संकट दिसत नाहीय हेच लक्षात येतं. तिसरी लाट कोणत्याही क्षणी धडक देऊ शकते याचा विचार करायला हवा, असं मानवी वर्तवणूक आणि संबद्ध विज्ञान संस्थेचे संचालक निमेश देसाई यांनी म्हटलं आहे.