लोक विचारत आहेत, जाहीरनाम्याचे काय?, भाजपा आणि काँग्रेसलाही होतोय उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:35 IST2017-12-04T02:35:12+5:302017-12-04T02:35:58+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपला जाहीरनामा जाहीर केलेला नाही.

लोक विचारत आहेत, जाहीरनाम्याचे काय?, भाजपा आणि काँग्रेसलाही होतोय उशीर
महेश खरे
सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपला जाहीरनामा जाहीर केलेला नाही. ही निवडणूक जाहीरनाम्याशिवायच लढविली जाणार आहे काय? असा सवाल मतदार विचारत आहेत.
काँग्रेसने सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून नव्हे, तर गुजरातच्या जनतेला विचारून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञान, संशोधनातील दिग्गज सॅम पित्रोदा आणि मधुसूदन मिस्त्री यांच्या टीमकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी गुजरातचा दौरा करुन मतदारांशी संवाद करुन परिवर्तनाबाबत मते जाणून घेण्याची योजना होती.
पित्रोदा यांनी केला होता दौरा
सॅम पित्रोदा आणि मिस्त्री यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या निर्देशानुसार दौराही केला होता. अहमदाबाद,बडोदा आणि सूरतमध्येही ते आले होते. विविध वर्गांतील लोकांशी त्यांनी चर्चा केली. लोकांची ‘मन की बात’ऐकली आणि आश्वासन दिले की, लोकांच्या सूचनांना महत्त्व दिले जाईल. दरम्यान, काँगे्रसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची तारीख २८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, डिसेंबर महिना सुरू झाला, तरी याबाबत हालचाल दिसत नाही.
भाजपाचा मुद्दा विकास
गुजरातचा विकास हाच
भाजपाचा निवडणुकीचा मुद्दा आहे. त्यांच्या जाहीरातीत ‘मैं
हूं विकास, सर्वांगीण विकास’ याबाबत बोलले जात आहे. भाजपाच्या जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप दिले जात
असून, तो कधीही जनतेसमोर येऊ शकतो. आमच्या २२ वर्षांच्या कामातून हे दिसून येते की, आम्ही गुजरातचा गौरव, समृद्धी आणि शांती यासाठी काम करत आहोत, असेही त्यांचे म्हणणे आहे.
जाहीरनामा नव्हे,
तर वचन पत्र
तर, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आम्ही जाहीरनामा नव्हे, तर वचन पत्र बनविणार आहोत. यात गुजरातची रुपरेखा असणार आहे. छोटे व्यावसायिक, कुटीरोद्योग
यांना साधनसामुग्री, आवश्यक
मदत उपलब्ध करुन देणार आहोत. त्यांचा इशारा कापड उद्योगाकडे होता. यातील लोक जीएसटीमुळे नाराज आहेत.