जिंकलंस पोरा! ज्या ऑफिसमध्ये होता शिपाई, तिथेच झाला अधिकारी; पाचव्या प्रयत्नात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:45 IST2024-12-09T14:44:09+5:302024-12-09T14:45:13+5:30
छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार बांधे यांनी कठोर परिश्रमाने राज्यातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

फोटो - nbt
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार बांधे यांनी कठोर परिश्रमाने राज्यातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शैलेंद्र हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मध्ये बीटेक पूर्ण केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोग (CGPSC) कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते.
शैलेंद्र यांनी पाचव्या प्रयत्नात CGPSC-२०२३ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. प्रत्येक निर्णयात साथ देणाऱ्या आई-वडिलांच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं, असं त्यांनी सांगितलं. शैलेंद्र म्हणाले की, या वर्षी मे महिन्यात त्यांची सीजीपीएससी कार्यालयात शिपाई म्हणून नियुक्ती झाली होती. ते बिलासपूर जिल्ह्यातील बिटकुली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. सध्या संपूर्ण कुटुंब रायपूरमध्ये राहतं.
रायपूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) रायपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकचं शिक्षण घेतलं. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकली असती, परंतु त्यांना सरकारी नोकरी करायची असल्याने त्यांनी 'प्लेसमेंट इंटरव्ह्यू'ला न जाण्याचा निर्णय घेतला.
मी पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही. पुढच्या वर्षी मुख्य परीक्षा पास होऊ शकलो नाही. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात मला मुलाखत क्लिअर करता आली नाही. पण मी हार मानली नाही, पाचव्या प्रयत्नात मला यश मिळालं असं शैलेंद्र यांनी म्हटलं आहे.
"कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अशा परिस्थितीत मला शिपाई म्हणून काम करावे लागले. पण यासोबतच मी राज्य नागरी सेवा परीक्षेचीही तयारी करत राहिलो. कोणतीही नोकरी मोठी किंवा लहान नसते, कारण प्रत्येक पदाची स्वतःची प्रतिष्ठा असते. शिपाई असो वा उपजिल्हाधिकारी, प्रत्येक कामात प्रामाणिकपणे आणि पूर्ण जबाबदारीने करावं लागतं."
"काही लोक मला शिपायाचं काम करत असल्याबद्दल टोमणे मारायचे, चेष्टा करायचे पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. माझे आई-वडील, कुटुंब आणि ऑफिसमधील लोक यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि मला प्रोत्साहन दिलं'' असं शैलेंद्र यांनी म्हटलं आहे. मला आशा आहे की, माझा मुलगा सरकारी नोकरी मिळवून देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणा बनेल असं मुलाच्या यशाबद्दल वडिलांनी म्हटलं आहे.