आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 08:32 IST2025-12-01T08:32:03+5:302025-12-01T08:32:40+5:30
या विधेयकात पान मसालावर सेस लावला जाऊ शकतो. त्यानंतर सिगारेट, तंबाखुसारख्या उत्पादनावर हा सेस लागू होईल.

आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत एक विधेयक सादर करणार आहेत. त्यात केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य यावरील खर्च पूर्ण करण्यासाठी पान मसाला आणि अन्य गोष्टींवर हेल्थ सिक्युरिटीतून नॅशनल सिक्युरिटी सेस लावण्याची तरतूद आहे.
या विधेयकात पान मसालावर सेस लावला जाऊ शकतो. त्यानंतर सिगारेट, तंबाखुसारख्या उत्पादनावर हा सेस लागू होईल. भविष्यात लोकांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारला या यादीत आणखी काही वस्तू वाढवण्याचा अधिकार आहे. एकदा विधेयक मंजूर झाले तर प्रस्तावित सेस त्या तारखेपासून लागू होईल जेव्हा सरकारकडून अधिकृतपणे याबाबत परिपत्रक जारी केले जाईल. सेस विधेयकाशिवाय सरकार इन्शुरन्स सेक्टरमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंटची मर्यादा ७४ टक्क्याहून १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी इन्शुरन्स लॉज विधेयक २०२५ देखील सादर करणार आहे. हेल्थ सिक्युरिटी ते नॅशनल सिक्युरिटी सेस बिल, सेंट्रल एक्ससाइज बिल हे सोमवारी लोकसभेच्या कामकाजात समाविष्ट आहे.
अधिवेशनात गोंधळाची शक्यता
या अधिवेशनात एसआयआरवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, समाजवादी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी मतदार यादीतील स्पेशल इंटेसिव्ह रिवीजन(SIR) वर चर्चा करण्याची प्रमुख मागणी उचलून धरली. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, आर्थिक मुद्दे, शेतकऱ्यांची स्थिती, महागाई, बेरोजगारी यावरून चिंता व्यक्त केली आहे.
३६ पक्षांनी घेतला सहभाग
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ३६ राजकीय पक्षांच्या ५० नेत्यांनी सहभाग घेतला होता. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. बैठकीत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, किरेन रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी होतील. या अधिवेशनात सरकारकडून १४ विधेयक मंजूर करण्याची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात बहुतांश विरोधी पक्ष SIR वर चर्चेसाठी आग्रही आहे. जर यावर चर्चा झाली नाही तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देता सुरक्षा मुद्द्यांवरही चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं विधान काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी केले आहे.