CoronaVirus: एक किलो बटाट्यांसोबत नेते जमले डझनभर; स्वपक्षीय खासदारावर भडकले परेश रावल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:56 IST2020-04-17T13:53:23+5:302020-04-17T13:56:17+5:30
भाजपा खासदाराच्या चमकोगिरीवरुन परेश रावल यांचा टोला

CoronaVirus: एक किलो बटाट्यांसोबत नेते जमले डझनभर; स्वपक्षीय खासदारावर भडकले परेश रावल
अहमदाबाद: सध्या देशावर कोरोनाचं मोठं संकट आहे. या संकट काळात गरिबांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. अनेक जण शांतपणे गरजूंना मदत करत आहेत. तर दुसरीकडे काही जण यातही चमकोगिरी करत आहेत. या दिखाऊ सोशलवर्कचे फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. भाजपा खासदाराचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरुन परेश रावल यांनी मार्मिक टोला लगावत नाराजी व्यक्त केली आहे.
परेश रावल यांनी गुरुवारी संध्याकाळी एक फोटो ट्विट केला आहे. 'आलू एक दर्जन, दयालु दो दर्जन', असं वाक्य फोटोसोबत या ट्विटमध्ये आहे. विशेष म्हणजे हा फोटो भाजपाचे खासदार सत्यजेव पचौरी यांचा आहे. ते लोकसभेत उत्तर प्रदेशातल्या कानपूरचं प्रतिनिधीत्व करतात. हा फोटो पाहून रावल यांच्यासोबत अनेकांनी पचौरींवर टीका केली आहे. फोटोमध्ये पचौरीसोबत मोठी गर्दी दिसते आहे. ही सगळी मंडळी एका भांड्यात बटाटे टाकत आहेत.
आलू एक दर्जन
— Paresh Rawal (@SirPareshRawal) April 16, 2020
दयालु दो दर्जन...🙄🙄🙄 pic.twitter.com/vi96PZDo6z
सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्कचा वापर करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा केलं आहे. मात्र हे आवाहन त्यांच्याच नेत्यांपर्यंत पोहोचलंय का, हा प्रश्न अनेकांना पचौरींचा फोटो पाहून पडला आहे. पचौरी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी जमलेल्या सगळ्यांनीच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजवले असून काहींनी मास्कदेखील घातलेला नाही. कोणाच्याही हातात ग्लव्जदेखील नाही. याशिवाय भाजपा खासदार पचौरींनी फोटो काढताना चेहऱ्यावरील मास्क हटवला आहे.