मागच्या काही वर्षांमध्ये सरकारी परीक्षांमधील पेपर फुटी ही गंभीर समस्या बनलेली आहे. आतातर या पेपरफुटीची पाळंमुळं थेट न्यायालयांपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे. राजस्थान हायकोर्टानमधील एलडीसी भरती परीक्षा २०२२ मध्ये पेपर खरेदी करून नोकरी मिळवणाऱ्या ९ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना एसओजी ( स्पेशल ऑपरेशन ग्रुप) ने अटक केली आहे. हे सर्व आरोपी राजस्थान उच्च न्यायालयाकडून आयोजित एलसीडी परीक्षेमध्ये माफियांकडून २०-२० लाख रुपयांना पेपर खरेदी करून परीक्षा उत्तीर्ण झाले होते.
एसओजीने या ९ आरोपींना राजस्थानमधील विविध जिल्हा न्यायालयांमधून कनिष्ठ सहाय्यक पदांवर काम करताना अटक करण्यात आली आहे. बीकानेरमधील पोरव कालेरा टोळीने राजस्थान हायकोर्ट एलडीसी परीक्षा २०२२ चा पेपर लीक केला होता, अशी माहिती एसओजीला मिळाली होती. या टोळीने २६ परीक्षार्थिंकडून प्रत्येकी २० लाख रुपये घेऊन परीक्षा केंद्रांवर ब्लूटूथच्या माध्यमातून कॉपी केली होती.
एसओजीने टोळीमधील १८ संशयितांची ओळख पटवली होती. तसेच या संशयितांपैकी ९ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अटक केली. यामधील ३ आरोपी हे नागौर जिल्ह्यातील खाजवाना मुंडवा गावातील रहिवासी आहेत, राजस्थान हायकोर्टाची एलडीसी भरती परीक्षा १२ आणि १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात आली होती. ज्यासाठी एकूण २८०० पदांसाठी अर्ज केला होता. परीक्षेचा निकाल राजस्थान उच्च न्यायालय, जोधपूर ११ जून २०२३ रोजी घोषित केला होता. या प्रकरणी पेपर माफिया टोळीचा म्होरक्या पोरव कालेरा सध्या तुरुंगात आहे. तसेच एसओजीचं पथक हे त्यांच्याकडून तपास करत आहेत.