पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला एका आठवड्यानंतर तिचे वडील हरीश मल्होत्रा यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ही भेट अवघ्या काही मिनिटांची होती. चौकशीदरम्यान झालेल्या या भेटीत ज्योतीने तिच्या वडिलांना धीर दिला. "पप्पा, टेन्शन घेऊ नका. माझ्यासाठी वकील पाहण्याची गरज नाही. न्यायाधीशांनी माझ्यासाठी वकीलाची व्यवस्था केली आहे. मी लवकरच बाहेर येईन" असं म्हटलं आहे. ज्योतीचे हे शब्द ऐकून तिचे वडील भावुक झाले.
ज्योती आयएसआय एजंट्सच्या संपर्कात असल्याचाही संशय आहे. यामुळे तिला ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर तिला अटक करण्यात आली. ज्योतीने ज्या ठिकाणी व्हिडीओ बनवले होते त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली. हिसार न्यायालयाने सुरुवातीला ज्योतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, जी नंतर आणखी चार दिवसांनी वाढवण्यात आली.
ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
"आज सुनावणी आहे पण तुम्ही न्यायालयात येऊ नका”
ज्योतीच्या वडिलांना सुनावणीच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्यास मनाई करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांचा दावा आहे की, एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, आज सुनावणी आहे पण तुम्ही न्यायालयात येऊ नका. ज्योतीच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी सरकारकडे मोठी मागणी केली होती. सरकारने वकील उपलब्ध करून द्यावा असं म्हटलं आहे. पोलिसांनी ज्योतीची डायरी काढून घेतली आहे. ज्योती त्या डायरीत काय लिहायची हे माहित नाही असंही वडिलांनी म्हटलं होतं.
"माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
"ज्योतीला पोलिसांनी संशयाच्या आधारे अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केलं जाईल. माझ्याकडे वकील नेमण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मी सरकारला आम्हाला वकील उपलब्ध करून देण्याची विनंती करतो. संशय कशाबद्दल आहे हे मला माहित नाही. मला हे सांगण्यात आलेलं नाही. मला सरकारी वकील हवा आहे. मी गरीब आहे. जर सरकारने मला वकील दिला तर मी खूप आभार मानेन. पोलिसांकडे ज्योतीचे सर्व फोन आहेत" असं ज्योतीचे वडील याआधी म्हणाले होते.