पंचकुलाच्या सेक्टर-२७ मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेहराडूनमधील एका कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. सेक्टर २७ मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये सर्वांचे मृतदेह आढळने एकच खळबळ उडाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबावर खूप मोठं कर्ज होतं, म्हणूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतताना त्यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये प्रवीण मित्तल (४२), प्रवीण यांचे पालक, प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एका मुलगा यांचा समावेश आहे.
घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. सध्या हे सातही मृतदेह पंचकुला येथील खासगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी अमित दहिया घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमान कथेला उपस्थित राहण्यासाठी हे कुटुंब डेहराडून येथून आलं होतं. कुटुंबावर खूप कर्ज होतं. कदाचित म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आलं असावं. सध्या सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि पुढील कारवाई सुरू आहे.