UP panchayat election 2021: निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, माजी प्रधानाने गावातला संपूर्ण रस्ताच खोदून टाकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:00 IST2021-05-07T00:00:01+5:302021-05-07T00:00:45+5:30
UP panchayat election 2021: पराभूत झालेल्या काही उमेदवारांना आपला पराभव पचनी पडत नाही आहे. अशाच एका नेत्याने पराभूत झाल्यानंतर गावातील संपूर्ण रस्ताच खोदून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

UP panchayat election 2021: निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, माजी प्रधानाने गावातला संपूर्ण रस्ताच खोदून टाकला
लखनौ - उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे. या निकालांनंतर काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद फुलला आहे. तर काही नेत्यांच्या पदरी पराभवाची निराशा पडली आहे. दरम्यान, पराभूत झालेल्या काही उमेदवारांना आपला पराभव पचनी पडत नाही आहे. अशाच एका नेत्याने पराभूत झाल्यानंतर गावातील संपूर्ण रस्ताच खोदून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (UP panchayat election 2021)
उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे प्रधान पदाची निवडणूक हरल्यामुळे संतप्त झालेल्या माजी प्रधानाने आपल्या कार्यकर्त्यांसोबत मिळून जेसीबीच्या मदतीने संपूर्ण रस्ताच खोदून टाकला. मात्र हा प्रकार सुरू असताना गावकऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली.
बाराबंकीमधील अहिरन सरैया गावातील माची प्रधान दीपक कुमार तिवारी हे पंचायत निवडणुकीत तिसऱ्या स्थानी राहिले. या दारुण पराभवामुळे या प्रधानांचा राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी हा राग रस्त्यावर काढला. दीपक कुमार तिवारी हे प्रधान असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात हा रस्ता बनवला होता. मात्र आता पराभव झाल्यानंतर त्यांनी गावात स्वत:च बनवलेला रस्ता उखडून टाकला.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दीपक कुमार तिवारी आणि त्यांचे सहकारी प्रक्षुब्ध झाले होते. त्यांनी मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे २०० मीटर लांब रस्त्याला लक्ष्य केले. रस्ता खोदून काढल्याने गावकरी संतप्त झाले. त्यांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे याबाबची तक्रार केली. दरम्यान, तालुक्यातील अधिकाऱ्यांनी निवडणुकीत गुंतलेले असल्याचे सांगत या प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. मात्र तक्रार मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे.