काही पैशांसाठी पाकिस्तानी गुप्तहेर बनलेल्या ज्योती मल्होत्राबाबत मोठमोठे खुलासे होत आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणांना आणखी सजग रहावे लागणार आहे. एरव्ही इकडे-तिकडे जात व्हिडीओ काढणाऱ्या ज्योती मल्होत्राने लष्करी दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पठाणकोटला जाऊनही व्हिडीओ का काढला नाही, असा प्रश्न तपास यंत्रणांसमोर उभा ठाकला आहे.
ज्योती एका मोठ्या हेरगिरी रॅकेट मॉड्यूलशी जोडली गेल्याचे समोर येत आहे. तिचे एकेक कारनामे ऐकून एनआयएचे अधिकारी ही केस आपल्या ताब्यात घेण्य़ाचा विचार करत आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर तिने पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशशी चॅट केले होते. त्याला ब्लॅकआऊटची माहिती दिली होती. नंतर तिने ती डिलीट केली. तिने असे का केले याचा तपास सुरु आहे. तसेच ज्योती बांगलादेशला जाणार होती. हल्लीच्या काळात बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जवळीक वाढू लागली आहे. भारताच्या चिकन नेकपर्यंत पाकिस्तानी अधिकारी जाऊन आले आहेत. बांगलादेश सर्व उपकार विसरून भारताविरोधात कारस्थान रचू लागला आहे. अशातच ज्योतीने बांगलादेशसाठीच्या व्हिसाच्या अर्जाची प्रत देखील तयार केली होती.
यामध्ये तिने बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरेकडील भाग असा तात्पुरता पत्ता लिहिला होता. भारताविरोधात कारस्थान रचणाऱ्या आयएसआयच्या बांगलादेशी टीममध्ये सहभागी होण्यासाठी ती जाणार होती, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. तिथे ती एका बैठकीत भाग घेणार होती. बांगलादेशमध्ये आयएसआय नवीन टीम तयार करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. ज्योतीला पठाणकोटला नेण्यात आले आहे. तिथे तिने काय केले हे देखील तपासले जात आहे. तिने या प्रवासाचा व्हिडीओ का काढला नाही असा प्रश्नही यामागे उपस्थित होत आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या फोटो आणि एका छोट्या क्लिपवरून तिने पठाणकोटला भेट दिल्याचे समोर आले.
पठाणकोट, गोल्डन टेंपलवर हल्ल्याचा प्रयत्न...ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानने पठाणकोट लष्करी तळ आणि गोल्डन टेंपलवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअर बेसची तपासणी करण्यासाठी ती तिथे गेल्याची शक्यता आहे. तसेच ज्योतीने व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या एन्क्रिप्टेड माध्यमांद्वारे गोल्डन टेंपल आणि काश्मीरमधील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ व लोकेशन पाकिस्तानी एजंटना पाठविले आहेत. सध्या एनआयए आणि आयबी ज्योतीची चौकशी करत आहेत. तिची कोठडी २२ मे रोजी संपत आहे.