पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफ जवानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ६ दिवस आधीपर्यंत तो जवान तिथे होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. एनआयएने सोमवारी हेरगिरीच्या आरोपाखाली एका सीआरपीएफ जवानाला अटक केली होती.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. एनआयएने अटक केलेला जवान हल्ल्याच्या सहा दिवस आधीपर्यंत पहलगाममध्ये होता. हल्ल्याच्या सहा दिवस आधीच सीआरपीएफ जवानाची बदली करण्यात आली होती. एनआयएने पाकिस्तानसाठी देशाशी गद्दारी करणाऱ्या या जवानाला दिल्लीतून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
सीआरपीएफ जवानावर काय आहे आरोप?
सीआरपीएफ जवान मोती राम जाट हा हेरगिरीच्या कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता आणि २०२३ पासून तो राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना (पीआयओ) देत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या जाटला या कामासाठी विविध माध्यमातून पैसे मिळत होते.
कसा पकडला गेला जवान?
सीआरपीएफने जवानाला यानंतर बडतर्फ केलं आहे. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सींच्या समन्वयाने सीआरपीएफने जवानाच्या सोशल मीडिया एक्टिव्हिटीवर बारकाईने लक्ष ठेवलं. त्यानंतर जवानाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान असं आढळून आलं की, त्याने प्रोटोकॉलचे उल्लंघन केलं आहे.
भारताने पहलगामचा घेतला बदला
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.