पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:03 IST2025-07-23T09:00:04+5:302025-07-23T09:03:54+5:30
Pakistani Aircraft : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील तहशतवादी तळांवर हल्ले केले होते.

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढतच गेला. यावेळी भारताने पाकिस्तानीविमानांना भारतीय हद्दीत प्रवेश दिला नव्हता. आता याबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी एका पोस्टमध्ये हवाई हद्दीवरील निर्बंधांची माहिती पोस्ट केली. "पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालणारी नोटीस टू एअरमेन अधिकृतपणे २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ विद्यमान सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आहे",अशी माहिती त्यांनी दिली.
या निर्णयाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स नंतर शेअर केले जातील. पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई हद्दीतून बंदी घालण्याच्या पूर्वीच्या निर्णयानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
२४ ऑगस्टपर्यंत बंदी
बंदी एका महिन्यासाठी म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने गेल्या आठवड्यात सांगितले की, पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमानांसाठी त्यांचे हवाई हद्द बंद करण्याचा कालावधी एका महिन्यासाठी म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.
ही बंदी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ५.१९ पर्यंत लागू राहील, असे पीएएने म्हटले आहे. दरम्यान, २३-२५ जुलै रोजी भारत-पाकिस्तान सीमेवर राजस्थानमध्ये होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या सरावासाठी NOTAM जारी करण्यात आला आहे.