पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:47 IST2025-06-04T10:46:57+5:302025-06-04T10:47:26+5:30
भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या सीमेजवळ आपली लढाऊ क्षमता पुन्हा एकदा दाखवून देणार आहे.

पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी
पाकिस्तानला आज पुन्हा एकदा भारताच्या हवाई दलाची ताकद पाहायला मिळणार आहे. भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या सीमेजवळ आपली लढाऊ क्षमता पुन्हा एकदा दाखवून देणार आहे. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या दक्षिणेकडील हवाई क्षेत्रात एक व्यापक सराव आयोजित करण्यात आला असून, यासाठी ‘NOTAM’ (Notice to Airmen) जारी करण्यात आले आहे. यामुळे, सराव कालावधीत सामान्य हवाई वाहतूक या क्षेत्रातून बंद राहणार आहे.
कोठे आणि केव्हा होतोय सराव?
हा सराव गुजरातमधील राजकोटजवळ पार पडणार आहे. हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेजवळ, सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असून अरबी समुद्राला लागून आहे. धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागात हा सराव ४ जून २०२५ रोजी होणार आहे. या सराव अभ्यासाची सुरुवात ४ जून, रोजी दुपारी ३:३० वाजता होणार असून, तो रात्री ९:०० वाजेपर्यंत चालणार आहे.
कोणत विमाने सहभागी होणार?
या सरावात भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक लढाऊ विमानं राफेल, सुखोई-३० आणि जग्वार सहभागी होणार आहेत. यामध्ये हवाई दलाची युद्धस्थितीतील तयारी, प्रतिसादक्षमता आणि धोरणात्मक तळ सज्जता तपासली जाणार आहे.
NOTAM म्हणजे काय?
NOTAM म्हणजे Notice to Airmen, एक अधिकृत सूचना प्रणाली आहे जी वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या धोक्यांबाबत किंवा ऑपरेशन्सवर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी माहिती देते. यात लष्करी सराव, हवामान स्थिती किंवा धावपट्ट्यांमध्ये होणारे बदल यांचा समावेश असतो. याचा उद्देश हवाई सुरक्षा सुनिश्चित करणे हा असतो.
याआधी झालेला राजस्थानमध्ये सराव
भारतीय हवाई दलाने याआधी ७ आणि ८ मे रोजी राजस्थान सीमेवरही एक मोठा सराव केला होता. त्यात राफेल, मिराज २००० आणि सुखोई-३० सारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होती. हा सराव देखील भारताच्या नियमित ऑपरेशनल रेडिनेस प्रक्रियेचा एक भाग होता.